अमरावती : भवानी चौक परिसरात सिलेंडरच्या स्फोटात २ ठार, एक गंभीर : मनोरुग्णाने स्फोट घडवून आणल्याची चर्चा
अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा : मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असलेल्या एकाने घरात सिलेंडरचा स्फोट घडवून जीवन संपवले. मात्र या घटनेत त्याच्यासह अन्य एकाचा बळी गेला तर एक जण मृत्यूशी झुंज देत आहे. जिल्ह्यातील वरुड येथील भवानी चौक परिसरातील ही घटना आहे.
एकाच वेळी दोन सिलेंडरच्या भीषण स्फोटात २ जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. मंगळवारी (दि.२) झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. मात्र, अग्निशमन दल व नगरपरिषद प्रशासनाचे अधिकारी वेळेवर हजर होऊ न शकल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.
प्राप्त माहितीनुसार, शंकर बुले (55) व ऋषिकेश चौधरी (25) अशी मृतकांची नावे आहे, तर श्याम चौधरी असे गंभीर जखमीचे नाव आहे. शंकर बुले हा मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे त्याने हा स्फोट घडवून आणल्याचे घटनास्थळावर बोलल्या जात आहे. घटनेच्या वेळी शंकर बुले याने दोरखंडाने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. त्या आधी त्याने बाथरूम मधील सिलेंडर व किचन मधील सिलेंडर हे दोन्ही सिलेंडर लिकेज करून ठेवलेले होते. त्यामुळे या दोन्ही सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली. घराला आग लागल्याचे ऋषिकेश व त्याचे वडील श्याम चौधरी यांना कळताच त्यांनी वर जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताच या दोघांना आगिने भस्मसात केले. यामध्ये ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे वडील श्याम हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. घटनेची माहिती वरूड शहरात पसरतात नागरिकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती. काही सुज्ञ नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले.मात्र नगरपालिकेचे अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी वेळेवर घटनास्थळावर न पोहोचल्याने नगरपरिषद प्रशासनाविरोधात परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला. मृतक शंकर हा मेंटली डिस्टर्ब होता. त्याची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गावी गेलेली होती. शंकरला मूलबाळ नसल्यामुळे तो एकटाच घरी राहत होता. अशातच त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कृत्यामुळे एकाचा बळी गेला असून अन्य एक जण मृत्यूशी झुंज देत आहे. पुढील तपास वरुड पोलीस करीत आहेत.
Latest Marathi News अमरावती : भवानी चौक परिसरात सिलेंडरच्या स्फोटात २ ठार, एक गंभीर : मनोरुग्णाने स्फोट घडवून आणल्याची चर्चा Brought to You By : Bharat Live News Media.