विखेंच्या प्रतिष्ठेची तर लंकेंच्या अस्तित्वाची लढाई

भाजपकडून विद्यमान खा. डॉ. सुजय विखे-पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आ. नीलेश लंके यांनी त्यांच्याविरुद्ध दंड थोपटायला सुरुवात केली. शरद पवारांच्या भेटीनंतरही लंकेंनी जाहीरपणे भूमिका मांडली नव्हती. लपूनछपून ते शरद पवारांची भेट व त्यांच्या पक्षाच्या बैठकांत सहभागी होत. त्यामुळे लंके लोकसभा लढणार की नाही, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देताना अस्तित्व … The post विखेंच्या प्रतिष्ठेची तर लंकेंच्या अस्तित्वाची लढाई appeared first on पुढारी.

विखेंच्या प्रतिष्ठेची तर लंकेंच्या अस्तित्वाची लढाई

संदीप रोडे

भाजपकडून विद्यमान खा. डॉ. सुजय विखे-पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आ. नीलेश लंके यांनी त्यांच्याविरुद्ध दंड थोपटायला सुरुवात केली. शरद पवारांच्या भेटीनंतरही लंकेंनी जाहीरपणे भूमिका मांडली नव्हती. लपूनछपून ते शरद पवारांची भेट व त्यांच्या पक्षाच्या बैठकांत सहभागी होत. त्यामुळे लंके लोकसभा लढणार की नाही, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देताना अस्तित्व पणाला लावत लोकसभेच्या आखाड्यात उडी घेतली. अपेक्षेप्रमाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी घोषित केली.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची पुत्रासाठी दुसर्‍यांदा लोकसभेचे मैदान मारण्याकरिता प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. विखेंना लोकसभेच्या आखाड्यात चितपट करण्यासाठी शरद पवारांनी डाव टाकत नीलेश लंके नावाचा पैलवान आखाड्यात उतरविण्याची बाजी यशस्वी केली!
नीलेश लंके यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. विखेंचा राजकीय इतिहास मात्र 55 वर्षांचा. स्व. बाळासाहेब विखे पाटील आठ वेळेस खासदार, केंद्रात मंत्रीही होते. राधाकृष्ण विखे-पाटील 35 वर्षांपासून आमदार आणि मंत्री. सुजय विखे-पाटील यांची अशी ही राजकीय पार्श्वभूमी पाहता त्यांनी पहिली सार्वजनिक निवडणूक लढविली ती थेट लोकसभेचीच. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी सुजय-विखेंची वाट बिकट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यावर मात करत सुजय हे दिल्लीत पोहोचलेच. पवार-विखे हा राजकीय संघर्ष तसा फार जुना. मात्र, या संघर्षाची धार आजही कायम असल्याचे लंके यांच्या उमेदवारीने पुन्हा अधोरेखित झाले. नीलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देताना शरद पवारांच्या नेतृत्वात लढाई करण्याची गर्जना करतानाच विखेंवर टीकेचे बाण सोडले. विखेंचा राजकीय इतिहास उगळताना त्यांनी कार्यकर्तृत्वाचाही पंचनामा केला. अर्थात हे सारे अपेक्षित होते. कारण विखे हेच त्यांचे प्रतिस्पर्धी होते. आता विखे-पाटील हे लंकेंचे बाण कसे परतवणार, हे पुढे दिसेलच.
दोघांचाही एकतर्फीचा दावा
नगर लोकसभा मतदार संघात पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, पाथर्डी-शेवगाव, राहुरी व नगर शहर हे विधानसभेचे मतदारसंघ येतात. या मतदार संघाची गोळाबेरीज पाहिली तर लंके-विखेंची लढत अटीतटीची होणार असेच दिसते. दोघांचेही समर्थक मात्र अटीतटीची लढत मान्य करायला तयार नाहीत. एकतर्फीचा दावा दोघांचेही समर्थक करत आहेत. सहापैकी तीन विधानसभा मतदार संघांत राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार आहेत. श्रीगोंदा, शेवगाव-पाथर्डीत भाजपचे तर नगर शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिले तर पारनेर, राहुरी व कर्जत-जामखेडवर लंकेंची मदार असेल. शरद पवारांच्या मनसुब्याला सुरुंग लावत दिल्लीची वाट सुकर करायची तर पवारांचे शिलेदार विखेंना गळाला लावावे लागतील.
2019 च्या निवडणुकीवेळी विखेंनी ‘हात’ सोडून भाजपची उमेदवारी केली होती. तेव्हा भाजप विखेंसाठी नवखा होता. त्यावेळी शिवसेना (एकसंध), भाजप आणि विखे व्होट बँक, असा तिहेरी संगम विखेंमागे होता. आताची परिस्थिती वेगळी आहे. शिवसेना व राष्ट्रवादी दुभंगली गेली. विखे-पाटीलही भाजपशी एकजीव झाले. भाजप व दुभंगलेली सेना, राष्ट्रवादी ही विखेंची जमेची बाजू; तर पक्षांतर्गत नाराजी, हेवेदावे, मतभेदाला मूठमाती देण्याचे आव्हान विखेंसमोर असेल.
लंके यांची पाटी मात्र लोकसभेला कोरी आहे. पारनेर मतदार संघातील विकास कामे आणि विखे विरोधकांवर मदार या लंके यांच्या जमेच्या बाजू. मात्र, मोदी लाटेचा सामना करण्याचे मोठे आव्हान लंकेंसमोर असेल. तोकडी यंत्रणा हेादेखील लंके यांच्यापुढील अडथळा असेल. अर्थात, शरद पवारांची जिल्ह्यावर असलेली मांड आणि लोकप्रियता लंकेंसाठी लाभदायी ठरण्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.
उमेदवार नवे, संघर्ष तोच!
1991 च्या निवडणुकीत स्व. बाळासाहेब विखे-पाटील यांनी बंडखोरी करत नगरमधून उमेदवारी केली. त्यांचा सामना काँग्रेस उमेदवार यशवंतराव गडाख यांच्याशी होता. गडाखांमागे शरद पवारांनी ताकद उभी केली होती. या निवडणुकीत गडाख विजयी झाले; पण विखेंनी कोर्टकचेरी करत त्याला आव्हान दिले. हायकोर्टात विखेंच्या बाजूने निकाल लागल्यानंतर शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. तेथे मात्र पवारांच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर देशाला आदर्श आचारसंहिता मिळाली. हे सांगण्याचे कारण इतकेच की, यावेळीही लंके यांच्या मागे शरद पवार आहेत, तर त्यांच्यासमोर स्व. बाळासाहेब विखेंचे नातू सुजय. एकंदरीत यंदाची नगर लोकसभेची निवडणूक 1991 च्या निवडणुकीची आठवण पाहता उमेदवार नवे असले तरी संघर्ष मात्र पवार-विखेंतच आहे.
Latest Marathi News विखेंच्या प्रतिष्ठेची तर लंकेंच्या अस्तित्वाची लढाई Brought to You By : Bharat Live News Media.