एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर?
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे हे भाजपच्या वाटेवर आहेत. खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानेच त्यांची सून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा भाजपने उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त लोकसभा निवडणुकीच्या आधी ठरतो की निवडणुकीनंतर याबाबत उत्सुकता आहे.
खडसे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपमध्ये जाण्याचे सध्या तरी कुठलेही कारण नाही आणि माझी इच्छाही नाही. मात्र केव्हाही जाईन त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवेन. शरद पवार यांच्या संमतीनेच जाईन. मी काही
लपून-छपून जाणार नाही. ज्यावेळी जाईन तेव्हा उघडपणे जाईन, असे वक्तव्य केले होते. भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ खडसे हे भाजपच्या संपर्कात आहेत. ते संपर्कात असल्यामुळेच रक्षा खडसे यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.
भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा आणि जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर झाला आहे. चौधरी यांना तर अडीच वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावे लागले. मात्र, ईडीच्या कारवाईत त्यांना आता जामीन मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना रावेरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव शरद पवार यांनी दिला होता. पण खडसे यांनी त्यास नकार दिला. आता खडसे हे आपल्या सुनेला निवडून आणण्यासाठी हातभार लावतील, अशी चर्चाही भाजपमध्ये आहे.
Latest Marathi News एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर? Brought to You By : Bharat Live News Media.