स्वातंत्र्यानंतर सिद्धटेकला प्रथमच पोस्ट! नागरिकांत आनंदाचे वातावरण
कर्जत : Bharat Live News Media वृत्तसेवा : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर म्हणजे तब्बल 77 वर्षांनंतर अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी एक असलेले तालुक्यातील सिद्धटेक येथे टपाल कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कर्जत येथील उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांच्या पुढाकारामुळे हे कार्यालय सुरू झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे. सिद्धटेकला आजतागायत टपाल कार्यालय अस्तित्वात नव्हते. शेजारी असणार्या जलालपूर या गावावर येथील सर्व नागरिकांना अवलंबून राहावे लागत होते. मात्र, मुक्काम पोस्ट सिद्धटेक, तालुका कर्जत आता सुरू झाले आहे. सिद्धटेक शाखा डाकघर हे राशीन उपडाकघर अंतर्गत काम करेल, तसेच सिद्धटेक या नवीन डाक कार्यालयाचा पिनकोड 414403 हा असणार आहे. टपाल कार्यालय सुरू झाल्यामुळे सिद्धटेक येथे मनिऑर्डर आता थेट पोस्टाने जाणार आहे.
नवीन डाक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नुकताच अहमदनगर विभागाचे वरिष्ठ डाक अधीक्षक बी. नंदा व कर्जत उपविभागाचे उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. या वेळी संतोष घागरे, कैलास भुजबळ, सुनील धस, अशोक मोकाशे, चंद्रकांत नेटके, गोविंद पवार, कार्तिकी खेडकर, सोनाली भारमल, संजय राऊत, लक्ष्मण शेटे, सुरज तोरडमल आदी उपस्थित होते. टपाल कार्यालयासाठी सिद्धिविनायक ट्रस्ट, ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. दर्शना लोटे यांनी सिद्धटेक येथील प्रथम शाखा डाकपाल म्हणून तात्पुरता पदभार स्वीकारला. परिसरातील ग्रामस्थांनी नवीन डाक कार्यालयामार्फत मिळणार्या डाक सेवांचा व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांनी केले.
भारत सरकारच्या डाक विभागांतर्गत विविध योजना व सेवा ग्रामस्थांसाठी आहेत. कार्यालयीन दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत विविध डाक सेवांचा लाभ सर्व पात्र ग्राहकांना सिद्धटेक या नवीन डाकघरामध्ये घेता येतील.
– बी. नंदा, वरिष्ठ डाक अधीक्षक, अहमदनगर
अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या सिद्धटेक येथे टपाल कार्यालय सुरू झाल्यामुळे लाडक्या व नवसाला पावणार्या गणपतीचा प्रसाद आता भाविकांना देशात कुठेही पाठवता येणार आहे.
– अमित देशमुख, उपविभागीय डाक निरीक्षक
हेही वाचा
अभिनेता गोविंदा उमेदवार नव्हे, शिवसेनेचा स्टार प्रचारक, विदर्भातून प्रचाराला करणार सुरूवात
Nashik News | सलाम तुमच्या कार्याला; पशुपक्षांची तहान भागवण्या राबताय भर उन्हात
Lok Sabha Election 2024 : चार मतदारसंघांवर मोहिते पाटलांचा प्रभाव
Latest Marathi News स्वातंत्र्यानंतर सिद्धटेकला प्रथमच पोस्ट! नागरिकांत आनंदाचे वातावरण Brought to You By : Bharat Live News Media.