रेल्वेचा शून्य भंगार उपक्रम; ६२ कोटी वाढीची गंगाजळी प्राप्त
नाशिक रोड : Bharat Live News Media वृत्तसेवा
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाला भंगार विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ६२.०६ टक्के वाढ झाली आहे. भुसावळ विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये तब्बल ८९.४३ कोटी उत्पन्न भंगार विक्रीतून मिळवले. यासाठी ५५ कोटींचे लक्ष्य दिलेले असताना मिळालेले हे उत्पन्न तब्बल ६२.०६ टक्के जास्त आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये विभागाने एकूण १२,५०० टन रेल्वे भंगाराची विक्री केली आहे. त्यात २० लोकोमोटिव्ह, ७७ वॅगन्स आदींचा समावेश आहे. भुसावळ विभागीय व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य व्यवस्थापन विभागाने “शून्य भंगार” उपक्रमास गती दिली. विशिष्ट विक्री लक्ष्यापेक्षा भंगार विक्रीत आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या कालावधीत तब्बल ६२.०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भंगारातून उत्पन्न मिळवण्याच्या भुसावळ विभागाच्या प्रयत्नांना प्रभावी यश मिळाले आहे. भुसावळ विभागाने वयोमर्यादा पूर्ण झालेली रेल्वे इंजिन्स व डबे, अतिरिक्त डिझेल इंजिन्स, वापरात नसलेले रेल्वे रुळ यासह विविध प्रकारचे भंगार यांचे वर्गीकरण केले. त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे त्या भंगाराचे उत्पन्नात रूपांतर झाले आहे. प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड विहित वेळेत भंगार साहित्यापासून पूर्णपणे मुक्त करणे हा “शून्य-भंगार” उपक्रमाचा भाग आहे. शून्य भंगार उपक्रमांतर्गत सर्व विभाग आणि डेपोंना भंगारमुक्त दर्जा मिळवून देण्यासाठी मध्य रेल्वेने पावले उचलली आहेत.
Latest Marathi News रेल्वेचा शून्य भंगार उपक्रम; ६२ कोटी वाढीची गंगाजळी प्राप्त Brought to You By : Bharat Live News Media.