पुणे: पिंपळवंडी येथे बिबट्यांच्या हल्ल्यात तीन शेळ्या मृत्यूमुखी
आळेफाटा: Bharat Live News Media वृत्तसेवा: पिंपळवंडी (ता. जुन्नर) शिवारातील लेंडेमळा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्याची घटना शनिवारी (दि. ३०) पहाटे घडली.
जुन्नर तालुक्याचे पूर्व भागात बिबट्यांचे हल्ल्यात पाळीव प्राणी व पशुधन ठार होत असल्याच्या घटना दिवसागणिक वाढतच असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिंपळवंडी परिसरातील रेडगाव धरणाचे कुकडी कालव्यालगत असलेल्या खालचे लेंडेमळा येथे उमेश कारभारी लेंडे यांच्या घरालगतच्या गोठ्यात असलेल्या शेळ्यांवर बिबट्यांनी शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हल्ला केला.
या हल्ल्यात गोठ्यातील तीन शेळ्या जागीच ठार झाल्या. शेळ्यांच्या आवाजाने लेंडे यांना जाग आली. ते व त्यांचे बंधू विजय लेंडे यांनी घराबाहेर येत बॅटरीचा झोत गोठ्यावर मारला असता त्यांना तिथे बिबट्या दिसून आला. यानंतर आरडाओडा केल्याने बिबट्याने लगतच्या उसात धूम ठोकली. पहाटे साडेचारच्या दरम्यान गोठ्याच्या ठिकाणी बिबट्या आला होता.
आळे वनपरिक्षेत्रचे वनपाल संतोष साळुंखे यांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला आहे. दोन बिबट्यांनी हा हल्ला केल्याचे उमेश लेंडे यांनी सांगितले. परिसरात बिबट्यांचा वावर असून काही दिवसांपूर्वी संकरित गायीचे एक वासरू देखील त्याच्या हल्ल्यात ठार झाले होते. बिबट्यांचा या परिसरात वावर असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे बिबट्याचे भय कायम असल्याचे या घटनेवरून दिसून येते.
हेही वाचा
पुणेकरांनो काळजी घ्या ! शहराने गाठली तापमानाची ‘चाळीशी’!
रेल्वेच्या पुणे विभागाची ‘हद्दवाढ’; रेल्वे संचलनासोबत प्रवाशांना ठरणार फायदेशीर
‘पुणे-नाशिक द्रुतगती’च्या भूसंपादनाला विरोध..
Latest Marathi News पुणे: पिंपळवंडी येथे बिबट्यांच्या हल्ल्यात तीन शेळ्या मृत्यूमुखी Brought to You By : Bharat Live News Media.