Crime News : मुंबईच्या चोरट्यांचा पुण्यात घरफोडीचा धंदा..
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : दिवसा घरफोड्या करणार्या दोघा सराईत चोरट्यांना चतुःशृंगी पोलिसांनी नालासोपारा पालघर येथून बेड्या ठोकल्या. मोहमद रईस अब्दुल आहद शेख (वय 37,रा.मालवणी, मुंबई), मोहमद रिजवान हनीफ शेख (वय 33,रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 30 तोळे सोन्याचे दागिने, रोकड, मोबाईल, गुन्ह्यात वापरलेले साहित्य असा 20 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघे घरफोड्यासाठी मुंबई व्हाया पुणे असा कॅबने प्रवास करत होते. 23 मार्च रोजी सकाळनगर बाणेर परिसरात भरदिवसा दोन ठिकाणी घरफोडी झाली.
चतुःशृंंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घरफोडी मुंबई परिसरात राहणार्या चोरट्यांनी केल्याची माहिती मिळाली. चोरट्यांना नालासोपारा पालघर येथून बेड्या ठोकल्या. ही कामगिरी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कुलकर्णी, गुन्हे निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील,उपनिरीक्षक रूपेश चाळके, अंमलदार सुधीर माने, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे,किशोर दुशिंग, मारुती केंद्रे,श्रीधर शिर्के, विशाल शिर्के, संदीप दुर्गे, फरफान मोमीन, बाबा दांडगे यांच्या पथकाने केली.
‘हम एरिया का पता भूल गये है जरा बताना’
भर दिवसा घरफोड्या करण्यासाठी दोघे चोर एक फंडा वापरत होते. पुण्यात दाखल झाल्यानंतर ते रिक्षा भाड्याने घेत होते. रिक्षात बसल्यानंतर ‘हम एरिया का पता भूल गये है, हमे जरा बता देना’ असे म्हणून मराठी परिसर असलेल्या सोसायट्यांची दोघे माहिती घेत. त्यानंतर त्या परिसरात जाऊन डल्ला मारत होते. मात्र, चतुःशृृंगी परिसरातील घरफोडी करताना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले अन् अडकले.
पोलिसांना दिला गुंगारा
पुण्यात घरफोड्या करण्यासाठी येत असताना, आरोपी कॅबने मुंबई ते पुणे असा प्रवास करत होते. घरफोड्या केल्यानंतर पुणे स्टेशन येथून ते मुंबईला पळून जात होते. त्यामुळे अनेक दिवसांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते. मोहमद रईस हा सराईत चोरटा असून, त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात तब्बल 30 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मोहमद रिजवान याच्यावर सहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा
सेवा विकास बँके गैरव्यवहार प्रकरण : रोझरीचा संचालक विनय अर्हानाला बेड्या
5 पाच हजार द्या, उतारा घ्या; लाच घेताना ग्रामसेवकाला पकडले
आळे येथे दिसून आली तरसाची दोन पिल्ले..!
Latest Marathi News Crime News : मुंबईच्या चोरट्यांचा पुण्यात घरफोडीचा धंदा.. Brought to You By : Bharat Live News Media.