वणवे रोखण्यासाठी मिळेना मशिन! सिंहगड वनसंरक्षण समितीची कैफियत

वणवे रोखण्यासाठी मिळेना मशिन! सिंहगड वनसंरक्षण समितीची कैफियत

खडकवासला : Bharat Live News Media वृत्तसेवा : वाहनचालक पर्यटकांकडून सिंहगडघेरा वनसंरक्षक समितीला टोलवसुलीतून (उपद्रव शुल्क) कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. मात्र, समितीला जंगलातील वणवे आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधक मशिनसाठी पैसे मिळत नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. गेल्या महिनाभरापासून सिंहगड किल्ल्याच्या परिसरात वणव्यांची मालिका सुरू आहे.
भीषण वणव्यांत शेकडो एकर क्षेत्रातील वनराई, चारा, वनसंपदा भस्मसात झाली आहे. एकाच वेळी तीन ते चार ठिकाणी वणवे लागत आहेत. वणवे रोखण्यासाठी आग प्रतिबंधक मशिनही पुरेशा नाहीत. त्यामुळे सुरक्षारक्षक, वन कर्मचार्‍यांना  दुर्गम डोंगराकडे कपारीत धाव घेऊन झाडाझुडपांच्या फांद्यांच्या साह्याने वणवे आटोक्यात आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

आतकरवाडी, डोणजे, खानापूर, मणेरवाडी आदी ठिकाणचे डोंगर काळेठिक्कूर पडले आहेत. वणवे रोखण्यासाठी वन विभागाने जंगलाच्या सभोवताली जाळरेषा काढल्या आहेत. मात्र, समाजकंटक जंगलाच्या मध्यभागी वणवा लावून पसार होत आहेत. दररोज लागणारे वणवे आटोक्यात आणण्यासाठी वन कर्मचार्‍यांसह सुरक्षारक्षकांना पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत जीव धोक्यात घालून धावपळ करावी लागत आहे.

वन संवर्धनासाठी 34 सुरक्षारक्षक तैनात
दरमहा वनसंरक्षण समितीला टोलवसुलीतून आठ ते दहा लाख रुपयांचे, तर वर्षाला जवळपास एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. समितीच्या माध्यमातून सिंहगडच्या पावित्र्यरक्षणासाठी तसेच वनसंवर्धनासाठी जवळपास 34 सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. मात्र, असे वणवे रोखण्यासाठी आवश्यक सामग्रींकडेच वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.

वणवे रोखण्यासाठी दोन आगप्रतिबंधक मशिन आहेत. मात्र, एकाच वेळी तीन-चार ठिकाणी वणवे लागत असल्याने अद्याप नवीन मशिनची गरज आहे. त्यासाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे.

-समाधान पाटील, वनपरिमंडल अधिकारी, सिंहगड वन विभाग

आगप्रतिबंधक मशिन तातडीने खरेदी करण्यात येणार आहे. त्याबाबतची आवश्यक प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल.

– प्रदीप सकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे (भांबुर्डा) वन विभाग 

वणवे रोखण्यासाठी आगप्रतिबंधक मशिन नसल्याने सुरक्षारक्षक झाडाझुडपांच्या फांद्यांनी वणवे नियंत्रणात आणत आहेत. फांद्याही अनेकदा आगीत जळून जातात. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. वणवे रोखण्यासाठी आगप्रतिबंधक मशिन व इतर साहित्य वनसंरक्षण समितीच्या निधीतून खरेदी करण्याची मागणी करूनही अद्याप साहित्य घेण्यात आले नाही.

– पांडुरंग सुपेकर, अध्यक्ष, घेरासिंहगड वनसंरक्षण समिती

हेही वाचा

Crime News : मुंबईच्या चोरट्यांचा पुण्यात घरफोडीचा धंदा..
5 पाच हजार द्या, उतारा घ्या; लाच घेताना ग्रामसेवकाला पकडले
सेवा विकास बँके गैरव्यवहार प्रकरण : रोझरीचा संचालक विनय अर्‍हानाला बेड्या

Latest Marathi News वणवे रोखण्यासाठी मिळेना मशिन! सिंहगड वनसंरक्षण समितीची कैफियत Brought to You By : Bharat Live News Media.