इतिहास घडविणारा हातकणंगले मतदारसंघ
चंद्रशेखर माताडे
हातकणंगले हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ 1962 ला आकाराला आला. या मतदार संघाने इतिहास घडविला. काँग्रेसची उमेदवारी म्हणजेच हमखास यशाची खात्री, हे समीकरणही खोटे ठरविले. कोल्हापूरच्या महाराणीसाहेबांना काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध विजयी करून नवा इतिहास या मतदारसंघाने रचला. आणीबाणीनंतर देशभर जनता दलाचे वातावरण असताना काँग्रेसच्या बाळासाहेब माने यांनी विजय मिळवून वादळात दिवा लावला. आता हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. 1962 च्या पहिल्याच निवडणुकीत या राखीव मतदार संघातून काँग्रेसचे कृष्णाजी लक्ष्मण मोरे यांनी विजयी सलामी दिली.
विजयमाला महाराणीसाहेब विजयी
1967 च्या निवडणुकीत काँग्रेसने ले. जनरल एस. पी. पी. थोरात यांना उमेदवारी दिली होती. थोरात विजयी झाल्यास आपल्या स्थानाला धक्का बसेल, या उद्देशाने थोरात यांच्या विरोधात काँग्रेस पक्षातूनच कारस्थान रचण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाने श्रीमंत छत्रपती विजयमाला महाराणीसाहेब यांना उमेदवारी दिली होती. त्या अपेक्षेप्रमाणे विजयी झाल्या. त्यांना 1 लाख 89 हजार 415 मते मिळाली होती. तर थोरात यांना 1 लाख 45 हजार 138 मते मिळाली.
1971 च्या निवडणुकीत दत्ताजीराव कदम यांनी येथून एकतर्फी विजय मिळविला. त्यांना 2 लाख 27 हजार 363 मते मिळाली होती. शेतकरी कामगार पक्षाचे त्र्यंबक सीताराम कारखानीस पराभूत झाले. त्यांना 1 लाख 42 हजार 378 मते मिळाली होती. आणीबाणीनंतर देशभर जनता दलाचे वातावरण असताना काँग्रेसचे बाळासाहेब माने यांनी जनता दलाचे काकासाहेब देसाई यांना पराभूत केले. माने यांना 2 लाख 11 हजार 309 मते मिळाली, तर देसाई यांना 1 लाख 77 हजार 945 मते मिळाली होती. काँगेसमधील फुटीनंतर बाळासाहेब माने यांनी आपली जागा कायम राखत 1980 च्या निवडणुकीत काँग्रेसमधीलच आपले जुने सहकारी बाळासाहेब पाटील-कौलवकर यांचा पराभव केला.
1984 च्या निवडणुकीत अचानकपणे कलाटणी मिळाली. बाळासाहेब माने हे शाहू महाराज यांना घेऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटल्याचा राग मनात धरून उदयसिंगराव गायकवाड यांनी राजवर्धन कदमबांडे यांना कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय करण्याचा प्रयत्न केला. कदमबांडे एस. काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या आजी श्रीमंत छत्रपती विजयमाला महाराणीसाहेब उतरल्या. माने कमी मताधिक्याने विजयी झाले.
माने यांच्या विरुद्ध काँग्रेसमधून उठाव
1989 च्या निवडणुकीतही माने यांना पक्षातूनच आव्हान उभारण्याचा प्रयत्न झाला. त्यांचे पक्षातील विरोधक व काही सहकारी साखर कारखानदारांनी शिरोळच्या दत्त सहकारी समूहाचे प्रमुख अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना रिंगणात उतरविले. विजयी माने यांना 2 लाख 75 हजार 674 मते मिळाली होती. तर सा. रे. पाटील यांना 2 लाख 2 हजार 584 मते मिळाली. 1991 च्या निवडणुकीत माने यांनी एकतर्फी बाजी मारली. माने यांना 3 लाख 60 हजार 679 मते मिळाली, तर जनता दलाचे सदाशिवराव सुलतानपुरे यांना 1 लाख 3 हजार 620 मते मिळाली.
कल्लाप्पाण्णा आवाडे लोकसभेवर
1996 च्या निवडणुकीत कल्लाप्पाण्णा आवाडे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांना माने यांच्या सूनबाई निवेदिता माने यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले होते. आवाडे विजयी झाले त्यांना 2 लाख 37 हजार 510 मते मिळाली, तर माने यांना 2 लाख 9 हजार मते मिळाली. 1998 मध्यावधी निवडणुकीत काँग्रेसच्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी आपली जागा कायम राखली. यावेळी त्यांना निवेदिता माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर आव्हान दिले होते.
निवेदिता माने विजयी
1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत निवेदिता माने या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांनी दोनवेळच्या पराभवाचा वचपा काढला. माने यांना 3 लाख 37 हजार 657 मते मिळाली, तर काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांना 3 लाख 24 हजार 845 मते मिळाली. 2004 च्या निवडणुकीत माने यांनी आपली जागा कायम राखली. यावेळी त्यांना शिवसेनेच्या डॉ. संजय पाटील यांनी आव्हान दिले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांचा 2009 च्या निवडणुकीत पराभव केला. माने यांची हॅट्ट्रिक हुकली.?2014 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचा पाठिंबा घेत शेट्टी यांनी जागा कायम राखली. विजयी शेट्टी यांना 6 लाख 40 हजार 428 मते मिळाली. तर काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांना 4 लाख 62 हजार 618 मते मिळाली.
धैर्यशील मानेंनी रोखली शेट्टींची हॅट्ट्रिक
2019 च्या निवडणुकीत धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांना शिवसेनेच्या तिकिटावर आव्हान दिले. विजयी माने यांना 5 लाख 82 हजार 776 मते मिळाली, तर शेट्टी यांना 4 लाख 87 हजार 276 मते मिळाली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अस्लम सय्यद यांनी उमेदवारी दिली होेती. त्यांना 1 लाख 23 हजार 151 मते मिळाली. वंचित आघाडीचा उमेदवार नसता तर येथे वेगळे चित्र दिसले असते, मात्र शेट्टी यांची हॅट्ट्रिक चुकली.
Latest Marathi News इतिहास घडविणारा हातकणंगले मतदारसंघ Brought to You By : Bharat Live News Media.