यमुनोत्रीमध्ये 3 भाविकांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

पर्वतीय भागात चढताना बिघडली होती प्रकृती वृत्तसंस्था/ उत्तरकाशी गढवाल हिमालयात 10 हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर असलेल्या यमुनोत्री धामाच्या यात्रेवर आलेल्या तीन भाविकांचे हृदयविकाराच्या धक्क्यामुळे निधन झाले आहे. मृत भाविकांमध्ये दोन जण मध्यप्रदेशातील तर एक जण उत्तरप्रदेशातील आहे. यमुनोत्री धामची यात्रा शुक्रवारपासून सुरू झाली आहे. यमुनोत्री धामचे दर्शन करण्यासाठी जात असलेल्या मध्यप्रदेशच्या नीमच येथील रहिवासी संपत्तिबाई […]

यमुनोत्रीमध्ये 3 भाविकांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

पर्वतीय भागात चढताना बिघडली होती प्रकृती
वृत्तसंस्था/ उत्तरकाशी
गढवाल हिमालयात 10 हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर असलेल्या यमुनोत्री धामाच्या यात्रेवर आलेल्या तीन भाविकांचे हृदयविकाराच्या धक्क्यामुळे निधन झाले आहे. मृत भाविकांमध्ये दोन जण मध्यप्रदेशातील तर एक जण उत्तरप्रदेशातील आहे. यमुनोत्री धामची यात्रा शुक्रवारपासून सुरू झाली आहे.
यमुनोत्री धामचे दर्शन करण्यासाठी जात असलेल्या मध्यप्रदेशच्या नीमच येथील रहिवासी संपत्तिबाई (62 वर्षे) या यमुनोत्री आधार शिबिरानजीक बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, जेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित पेले. तर अन्य एका घटनेत सागर जिल्ह्यातील रामगोपाल (71 वर्षे) आणि उत्तरप्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील विमला देवी (69 वर्षे) यांचेही हृदयविकाराच्या धक्क्यामुळे निधन झाले आहे.
यमुनोत्री धामच्या अवघड पायी यात्रेदरम्यान अनेकदा ऑक्सिजनचे तुलनेत कमी प्रमाण आणि अतिथंडीमुळे भाविकांची प्रकृती बिघडत असते. अवघड पर्वतीय यात्रा पाहता लोकांना थांबून-थांबून यात्रा करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
हवामान विभागाने रविवारी उत्तराखंडच्या 5 जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करत वादळ आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्य्ाा कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढमध्ये 45-50 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे भाविकांना खबरदारी घेण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.