व्ही. के पांडियन यांची राजकीय निवृत्तीची घोषणा

व्ही. के पांडियन यांची राजकीय निवृत्तीची घोषणा

नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय : कार्यकर्त्यांची मागितली माफी
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय बीजेडी नेते व्ही. के. पांडियन यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत बीजेडीच्या दाऊण पराभवानंतर पक्षाचे सुप्रीमो नवीन पटनायक यांच्या जवळचे असलेले व्ही. के. पांडियन यांनी सक्रिय राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. अत्यंत भावूक होऊन त्यांनी ही घोषणा केली आहे.
बिजू जनता दलाला लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीत नवीन पटनायक यांनाही मोठा धक्का बसला आहे. जवळपास अडीच दशकांच्या राजकारणात पटनायक यांना अशा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा करताना बीजेडी नेते भावुक झाले. ‘आता मी सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवासात माझ्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो. यासोबतच मी या निवडणूक प्रचारात दिलेल्या भाष्यांमुळे बीजेडीचे काही नुकसान झाले असेल किंवा पक्षाचा पराभव झाला असेल तर मी माफी मागू इच्छितो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आयएएस अधिकारी ते राजकारणापर्यंतचा प्रवास
तामिळनाडूमध्ये जन्मलेले व्ही. के. पांडियन हे आयएएस झाले आहेत. असे असतानाही त्यांनी ओडिशाच्या राजकारणात आपला ठसा उमटवला. माजी आयएएस अधिकारी पांडियन यांची सेवाकाळापासून नवीन पटनायक यांच्या जवळच्या मित्रांमध्ये गणना केली जाते. पांडियन हे ओडिशा केडरचे 2000 बॅचचे आयएएस अधिकारी होते. 2002 मध्ये त्यांना कालाहंडीमध्ये पहिली पोस्टिंग मिळाली. 2007 मध्ये व्ही. के. पांडियन यांचा नवीन पटनायक यांच्या गुडबुक्समध्ये प्रवेश सुरू झाला. त्यांना गंजाम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बनवण्यात आले. गंजाम हा नवीन पटनायक यांचा होम जिल्हा आहे. यानंतर पटनायक यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांमध्ये पांडियन यांची गणना होऊ लागली.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बीजेडी प्रभावहीन
ओडिशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी झाल्या. निकालाअंती या दोन्ही निवडणुकीत बीजेडी प्रभावहीन असल्याचे स्पष्ट झाले. ओडिशामध्ये लोकसभेच्या 21 जागा आहेत. भाजपने अनपेक्षित यश मिळवत 20 जागा जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले. तर नवीन पटनायक यांच्या पक्षाला केवळ 1 जागा मिळाली. विधानसभा निवडणुकीतही भाजपने अप्रतिम कामगिरी केली. ओडिशामध्ये विधानसभेच्या एकूण 147 जागा आहेत. यापैकी 78 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर बीजेडीला 51 जागा मिळाल्या. काँग्रेसने विधानसभेच्या 14 जागा जिंकल्या आहेत.