मिलरमुळे आफ्रिकेचा पराभव टळला

मिलरमुळे आफ्रिकेचा पराभव टळला

नेदरलँड्सने सामना थोडक्यात गमावला, आफ्रिकेचा चार गडी राखून विजय
वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
टी 20 वर्ल्डकपमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सचा 5 विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ?डम मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आफ्रिकन गोलंदाजांसमोर नेदरलँड्सचा संघ 20 षटकात 9 बाद 103 धावा करू शकला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने विजयी लक्ष्य 18.5 षटकांत 6 गडी गमावून गाठले. मिलरने षटकार मारून सामना संपवला. मिलरने 51 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 59 नाबाद धावा केल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
प्रारंभी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार अॅडम मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकन गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवला. सलामीवीर मायकेल लेविटला भोपळाही फोडता आला नाही तर ओ डोड 2 धावा काढून बाद झाला. विक्रमजीत सिंग (12) व बास डी लीडे (6) हे स्टार फलंदाजही स्वस्तात बाद झाल्याने नेदरलँडची 4 बाद 32 अशी स्थिती झाली होती. यावेळी सिब्रँड एंजेलब्रेक्टने 45 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले.  याशिवाय लोगान वॉन विकने 22 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. मात्र डचच्या बहुतांश फलंदाजांनी निराशा केल्याने नेदरलँडचा संघ 20 षटकांत 9 बाद 103 धावा करू शकला.
आफ्रिकेचाही विजयासाठी संघर्ष
104 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात अतिशय वाईट झाली. एकवेळ दक्षिण आफ्रिकेने 12 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. तसेच, आफ्रिकादेखील अपसेटचा बळी ठरेल, असे वाटत होते. मात्र, ट्रिस्टन स्टब्सने डेव्हिड मिलरसह पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. स्टब्सने 37 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 33 धावा केल्या. स्टब्ज बाद झाल्यानंतर मिलर एकटा लढला. त्याने 51 चेंडूत नाबाद 59 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
 
संक्षिप्त धावफलक : नेदरलँड 20 षटकांत 9 बाद 103 (विक्रमजीत सिंग 12, सायब्रँड 40, स्कॉट एडवर्ड 10, लोगान विक 23, ओटनील बार्टमन 4 बळी, नोर्तजे व मार्को यान्सेन प्रत्येकी दोन बळी).
दक्षिण आफ्रिका 18.5 षटकांत 6 बाद 106 (टिस्टन स्टब्ज 33, डेव्हिड मिलर नाबाद 59, लोगान विक व किंगमा प्रत्येकी दोन बळी).