तरुणाईला तंबाखूपासून दूर ठेवणे आवश्यक

तरुणाई व्यसनापासून अलिप्त राहिली तरच देशाचे भवितव्य : मुलांचा वाढता सहभाग चिंताजनक बाब बेळगाव : या देशाचे भवितव्य तरुणाईच्या हातात आहे, असे पंतप्रधानांपासून आपले सर्व नेते म्हणत आहेत. परंतु तरुणाई व्यसनापासून दूर राहिली तरच ते देशाचे भवितव्य घडवू शकतात, हे वास्तव आहे. तंबाखूसह मादक पदार्थांचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि ती संपूर्ण समाजासाठी चिंताजनक […]

तरुणाईला तंबाखूपासून दूर ठेवणे आवश्यक

तरुणाई व्यसनापासून अलिप्त राहिली तरच देशाचे भवितव्य : मुलांचा वाढता सहभाग चिंताजनक बाब
बेळगाव : या देशाचे भवितव्य तरुणाईच्या हातात आहे, असे पंतप्रधानांपासून आपले सर्व नेते म्हणत आहेत. परंतु तरुणाई व्यसनापासून दूर राहिली तरच ते देशाचे भवितव्य घडवू शकतात, हे वास्तव आहे. तंबाखूसह मादक पदार्थांचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि ती संपूर्ण समाजासाठी चिंताजनक बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 1988 मध्ये तंबाखूच्या साथीच्या आजारांकडे आणि त्याच्या सेवनामुळे होणारे रोग आणि मृत्यू याकडे जगाचे लक्ष वेधण्याच्या हेतूने 31 मे रोजी तंबाखूविरोधी दिन आचरणात आणण्याचे ठरविले. दरवर्षी या दिनाच्या निमित्ताने आरोग्य संघटना एक ब्रीद वाक्य (थीम) देते. यंदाचे ब्रीद वाक्य ‘तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करणे’ हे आहे. याचाच अर्थ या उद्योगामध्ये आणि सेवनामध्येसुद्धा मुलांचा सहभाग वाढतो आहे आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे. ‘युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल’नुसार जागतिक स्तरावर 13 ते 15 वयोगटातील 38 दशलक्षहून अधिक तरुण तंबाखूचे सेवन करतात. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत 2019 मध्ये आयोजित जागतिक युवा तंबाखू सेवन सर्वेक्षणामध्ये भारतात 13 ते 15 वयोगटातील जवळ जवळ एक पंचमांश विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यात तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले होते. मुलांमध्ये हे प्रमाण 9.6 टक्के होते. अधिक चिंतेची बाब म्हणजे मुलींमध्ये तंबाखूचे व्यसन वाढत असून हे प्रमाण 7.4 टक्के होते. धूम्रपान करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 2.8 टक्के होते. सिगारेट आणि बिडी ओढणारे किंवा तंबाखूचा वापर करणाऱ्या मुलांचे वय साधारण 9 ते 11 वयोगट असे होते. तंबाखूच्या सेवनामुळे जगभरात दरवर्षी 8 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. भारतात सुमारे 1 दशलक्ष मृत्यू होतात. तंबाखूचे सर्व प्रकार हानिकारक आहेत. तंबाखूचे सेवन करणे किंवा धूम्रपान करणे घातक आहे. धूम्रपानाच्या प्रकारामध्ये बिडी, सिगारेट, हुक्का, चिलम, रोल इत्यादींचा समावेश आहे. धूरविरहित तंबाखूच्या वापरामध्ये गुटखा, पान मसाला, मिश्री यांचा समावेश आहे. आजही अनेक ठिकाणी दात आणि हिरड्यांना मिश्री लावली जाते.
आरोग्य संघटनेनुसार तंबाखू सेवन करणारे निम्मे लोक अकाली मरण पावतात. तंबाखू आणि निकोटीन मार्केटची उलाढाल करणारे तरुण आणि किशोरवयीन यांना वेगवेगळ्या समाजमाध्यमांमधून प्रलोभने दाखवितात. आकर्षक डिस्प्ले केले जातात. शाळांजवळ तंबाखू किंवा मादक पदार्थांच्या जाहिरातींचे दुकान असू नये, असा नियम असला तरी त्याचे पालन होत नाही. उलट तंबाखू उत्पादने गोड आणि फळांच्या चवीमध्ये विकणे, ते आकर्षक डिझाईनमध्ये, वेस्टनामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. तंबाखूचे सेवन मुलांनी करण्याची कारणे म्हणजे बरोबरीच्या मित्रांमध्ये तंबाखू चघळला जाणे, नट-नट्यांचे अनुकरण करणे, कुतूहल, कुटुंबातील विसंवाद, दबाव अशी अनेक आहेत. तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग होतो. अलीकडे त्याचे प्रमाण वाढते आहे. तंबाखूमधील निकोटीन आणि अन्य रसायने कर्करोगास कारणीभूत आहेत. तंबाखूच्या पानातील निकोटीन त्वचेतून शरीरात जाते. त्यामुळे मळमळणे, चक्कर येणे, उलट्या होणे, डोके जड होणे, पोट दुखणे अशा तक्रारी उद्भवत आहेत. तंबाखू सेवनापासून मुलांनीच नव्हे तर सर्वांनीच दूर राहणे समाजासाठी आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नाही. मात्र डॉक्टर, पालक, समुपदेशक यांनी मुलांवर लक्ष केंद्रित करून त्यांना तंबाखूपासून दूर ठेवणे अतिशय आवश्यक आहे. मुलांच्या वर्तनातील फरक पालकांनी लक्षात घ्यायला हवा. त्याचबरोबर ते कोणाच्या संगतीत आहेत, हेसुद्धा पाहणे आवश्यक आहे. सरकारने यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. 1800112356 या क्रमांकाच्या हेल्पलाईनवर तंबाखूची सवय सुटण्यासाठी समुपदेशन केले जाते. आपली मुले तंबाखू सेवन करत नाहीत ना? यावर पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे.
प्रा. डॉ. राजेंद्र मेटगुडमठ,सिनियर हेड अँड नेक कॅन्सर सर्जन, केएलई हॉस्पिटल
कोणतेही व्यसन सुटणे शक्य
तंबाखू, किंवा मादक पदार्थांचे वाढते व्यसन ही चिंताजनक बाब आहे. त्याहीपेक्षा विद्यार्थीदशेतच हे व्यसन वाढू लागले आहे. अशा वेळी केवळ मुलांना दोष देऊन चालणार नाही. सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, मानसिक अशी अनेक कारणे व्यसन लागण्याच्या मागे असतात. या सर्व घटकांचा विचार करून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत केएलई हॉस्पिटलचे मानसोपचारतज्ञ डॉ. अँटोनिओ कारव्हालो यांनी व्यक्त केले. डॉ. कारव्हालो केएलई चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षांपासून ज्येष्ठ डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. व्यसनाधीन असणाऱ्या व त्यामुळे विविध आजार झालेल्या रुग्णांवर उपचार करतानाच त्यांचे समुपदेशन ते करतात. त्यांच्या मते आजच्या पिढीसमोर आव्हाने असली तरी त्यांच्या समोर प्रलोभनेही तेवढीच आहेत. त्यापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी कुटुंबात अत्यंत खेळीमेळीचे वातावरण असायला हवे. मात्र, असे असले तरी कोणत्या ना कोणत्या बाह्या कारणामुळेसुद्धा व्यसन लागू शकते. तंबाखूमधील निकोटीन घटकामुळे मेंदू एकदम तरतरीत होतो. पण ही सर्व अल्पकालीन मजा असते. सातत्याच्या सेवनामुळे शरीरावर गंभीर परिणाम होतात. अनेकदा तंबाखू खाल्ल्याशिवाय आपल्याला प्रातर्विधीला जाताच येत नाही, असे सांगणारे अनेक जण आहेत. परंतु हे व्यसन सुटू शकते. त्यासाठी पर्यायी उपचार उपलब्ध आहेत.
तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोग होतो. लिव्हर खराब होऊ शकते. तोंडाच्या कॅन्सरचा धोका तर आहेच. परंतु हृदयाच्या नसा आकुंचन पावतात. त्यामुळे ज्यांचे हृदय कमकुवत आहे, ज्यांना बीपी किंवा तत्सम त्रास आहे, त्यांच्यासाठी धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन ही धोक्याची घंटा आहे. याशिवाय एक व्यक्ती जरी धूम्रपान करत असली तरी समोरील व्यक्तीलासुद्धा त्याचा त्रास (पॅसिव्ह स्मोकिंग) होऊ शकतो. दुर्दैवाने आपल्याकडे ‘स्मोकिंग झोन’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविली जात नाही. त्यामुळे कोठेही, कधीही, सार्वजनिक ठिकाणीसुद्धा धूम्रपान करणारे लोक आपल्याला दिसतात. अलीकडच्या पिढीमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. लहान-सहान आव्हानेसुद्धा त्यांना पेलवत नाहीत, असे विचारता डॉ. कारव्हालो म्हणाले, यामध्ये नक्की चूक कुणाची आहे हे आपण तपासायला हवे. विभक्त कुटुंबामध्ये एक किंवा दोन मुले असतात. पालक अति लाड करतात. मुले जे मागतील देण्याची सवय लावली जाते. त्यामुळे मुलांमध्ये नकार पचवण्याची क्षमताच निर्माण होत नाही. ‘फ्रस्ट्रेशन टॉलरन्स’ म्हणजेच नकार किंवा निराशा संयमाने स्वीकारण्याची क्षमता निर्माण करण्यात आपण कमी पडतो. याकडे पालकांनी प्रथम लक्ष द्यायला हवे. तंबाखूचे किंवा कोणतेही व्यसन सुटू शकते. अलीकडे निकोटीन पॅच लावले जातात. च्युई&ंगम दिले जाते, हळूहळू त्याचे प्रमाण कमी करत यावे लागते. मात्र त्यासाठी योग्य उपचार, समुपदेशन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व डॉक्टर तयार असले तरी प्रतिष्ठा, लोक काय म्हणतील? याचा विचार न करता पालकांनी मुलांना घेऊन येणे आवश्यक आहे, असे डॉ. कारव्हालो म्हणाले.
मानसोपचारतज्ञ डॉ. अँटोनिओ कारव्हालो