निर्बंध पशुबळीवर… श्रद्धा निरंतर

निर्बंध पशुबळीवर… श्रद्धा निरंतर

क्रांतिकारी निर्णयाचे सर्व स्तरातून अभिनंदन
बेळगाव : उचगावच्या मळेकरणी देवस्थान परिसरात बकऱ्यांचा बळी देण्याच्या प्रथेवर निर्बंध घालण्यात आले. उचगाव ग्राम पंचायत, देसाई भाऊबंद समिती, देवस्की पंच समिती आणि ग्रामस्थ यांनी एकत्रित बहुमताने हा निर्णय घेतला आणि या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. मळेकरणी देवी हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. परंतु मळेकरणीच्या नावे बकऱ्यांचे बळी देऊन जेवणावळी होत. हळूहळू हे प्रमाण वाढत जाऊन अनेक समस्याही उद्भवल्या. या पार्श्वभूमीवर उचगाववासियांनी घेतलेल्या निर्बंधाबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याच अनुषंगाने काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
उचगाववासियांनी घेतलेला निर्णय ऐतिहासिक
उचगाववासियांनी घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आहे. कोणताही देव, देवी भक्तांकडून कोणतीच अपेक्षा करत नाही. आपला नमस्कारसुद्धा देवांना पुरेसा आहे. ऋण काढून सण साजरा करण्यामुळे कर्जाचा बोजा वाढतो. सण आनंदाने साजरे व्हावेत. परंतु त्यासाठी कोणाचाही बळी देणे, कर्जाचे बोजे वाढविणे बरोबर नाही. मी गेल्या 35 वर्षांपासून प्राणीबळी देण्याच्या प्रथेविरुद्ध लढा देत आहे. मला पोलीस आणि माध्यमे यांचे सहकार्य मिळत असले तरी मी पूर्णपणे यशस्वी झालो आहे असे नाही. या पार्श्वभूमीवर उचगाववासियांनी घेतलेल्या निर्णयाने मला अत्यानंद झाला आहे. हा विश्व कल्याणाचाच निर्णय म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे कोणत्याही दबावाशिवाय ग्रामस्थांनी स्वयं निर्णय घेतला आहे. ही भारताच्या धार्मिक इतिहासातील महत्त्वाची घटना म्हणता येईल. अहिंसा व अध्यात्म हे भारताचे वैशिष्ट्या आहे. तरीही आपल्याकडे प्राणीबळी प्रथा आहे. तिचे पूर्ण उच्चाटन झालेले नाही. खासगीच नव्हे तर सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या काही मंदिरांमध्येसुद्धा प्राणीबळी दिले जातात. या पार्श्वभूमीवर उचगावच्या लोकांनी घेतलेला निर्णय हा भारतीय धार्मिक परंपरेतील मैलाचा दगड ठरणार आहे. यामुळे उचगावच्या जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जेथे जेथे प्राणीबळी प्रथा आहे, त्यांनीसुद्धा त्यांचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
-स्वामी दयानंद सरस्वती
वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार
उचगाव गावच्या जागृत मळेकरणी देवीच्या यात्रेवर उचगाव ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी बंदी घालून एक योग्य निर्णय घेतलेला आहे. कारण या यात्रेमुळे दर मंगळवार व शुक्रवारी यात्रेसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. तसेच यानिमित्ताने दिवसाही मद्यपान करण्याचे प्रमाण वाढले होते. शुक्रवारी व मंगळवारी उचगावात वाहनधारकांचा चक्काजाम होत होता. यामुळे आजूबाजूला असलेल्या बसुर्ते, बेकिनकेरे या गावांतील नागरिकांना एखाद्या ऊग्णाला बेळगावला दवाखान्याला घेऊन जायचे असेल तर दोन-दोन तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून बसण्याची वेळ येत होती. यात्रेच्या वाहतुकीच्या कोंडीमुळे ऊग्णांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे एकूणच घेतला गेलेला निर्णय योग्य आहे.
मनोहर बेळगावकर-बिजगर्णी ग्राम पंचायत अध्यक्ष 
शेतकऱ्यांचा विचार करता यात्रेवर बंदी हा निर्णय योग्य
शुक्रवार व मंगळवार असे आठवड्यातील दोन दिवस उचगाव मळेकरणी देवीची यात्रा भरत होती. यात्रेत भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती.  तसेच मांसाहाराबरोबरच मद्यपान सेवन करून सर्व बाटल्या शेतशिवारामध्ये टाकण्याचे प्रकार वाढले होते. काहीजण दारूच्या नशेत बाटल्या शिवारात फोडू लागले होते. याचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पावसाळ्यात चिखलामध्ये काचा ऊतल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पायांना जखमाही झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करता यात्रेवर बंदी हा निर्णय योग्य आहे. इतर गावांनीही उचगाव ग्राम पंचायतीचा आदर्श घेण्यास हरकत नाही.
-प्रताप सुतार- बेळगुंदी ग्राम पंचायत अध्यक्ष 
छोट्या व्यावसायिकांना आता नुकसान सहन करावे लागणार
यात्रेवर बंदी घालण्यात आलेली आहे. परंतु त्याचे काही तोटेही होणार आहेत. या यात्रेमुळे अनेकांचे व्यवसाय सुरू होते. देवीच्या मंदिर परिसरात नारळ, फुलहार, आईस्क्रीम, विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. या छोट्या व्यावसायिकांना आता नुकसान सहन करावे लागणार आहे. गर्दी कमी झाली तर खरेदीही कमी होईल व छोटे व्यापारी अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे याचा विचार व्हायला हवा. तसेच यात्रेच्या निमित्ताने व नातेवाईक, मित्रमंडळी यांची गाठभेट होत होती. स्वच्छतेचा मुद्दा यावर भर द्यावा, तसेच यात्रा करणाऱ्यांवर काही निर्बंध लागू करावेत.
-एन. के. नलवडे- बेळवट्टी 
मनोभावे भक्ती केल्यास देव नक्कीच प्रसन्न होतो
आपली भारतीय संस्कृती ही देवाला मानणारी आहे. देवावर श्र्रद्धा असावी, परंतु देव कधीही बकरा मारा, कोंबडा कापा असे सांगत नाही. आपण मनोभावे देवाची भक्ती केल्यास देव नक्कीच प्रसन्न होतो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. उचगाव यात्रेवर बंदी हा योग्य निर्णय घेतलेला आहे. कारण या यात्रेच्या दिवशी त्या परिसरात प्रदूषणामध्ये वाढ झालेली असते. तसेच श्र्रद्धा कमी आणि मांसाहार जास्त असा प्रकार घडलेला आहे. पशुबळीला निर्बंध घालण्यात आलेला आहे. मात्र भक्तांना देवीच्या दर्शनाला जाता येणार आहे. देवीची ओटी भरता येणार आहे. त्यामुळे केवळ पशुबळी थांबविण्यात आलेली आहे. अतिशय योग्यच असा हा निर्णय आहे.
वाय. पी. नाईक-कावळेवाडी 
जो सुवर्णमध्य निघाला आहे तो स्वागतार्ह
देवावर लोकांची श्रद्धा असते. त्याला कोणाचाच विरोध असणे कारण नाही. परंतु ज्या पद्धतीने पशुबळी होत होते त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले होते. तेथे प्रश्न स्वच्छतेचा आणि आरोग्याचाही होतो. त्याबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून या प्रश्नावर उपाययोजना करण्याची विनंती केली होती. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुखांचीही भेट घेतली होती. भक्तांना देवीचे दर्शन घेण्यास स्वातंत्र्य आहे. ओटी भरणेही शक्य आहे. त्यामुळे जो सुवर्णमध्य निघाला आहे तो स्वागतार्ह आहे.
-डॉ. सोनाली सरनोबत