नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना एकत्र ठेवणं हे नरेंद्र मोदींसमोरचं मोठं आव्हान का आहे?

नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना एकत्र ठेवणं हे नरेंद्र मोदींसमोरचं मोठं आव्हान का आहे?

नरेंद्र मोदी आता किती काळ पंतप्रधान राहणार आणि कोणत्या पद्धतीने काम करणार हे सगळं आता नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर अवलंबून असेल.

 

मागच्या दोन्ही वेळेस भाजप केंद्रात बहुमतात होतं. यावेळी मात्र बहुमत एनडीएला मिळालं आहे. अशा स्थितीत मोदींना त्यांचे अनेक अजेंडे बाजूला ठेवावे लागतील.

 

भाजपने 240 जागा जिंकल्या असून बहुमतासाठी 272 जागांची गरज आहे. मात्र, एनडीएला 293 जागा मिळाल्या असून सरकार स्थापनेसाठी एवढ्या जागा पुरेशा आहेत.

 

चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने मिळून 28 जागा जिंकल्या आहेत आणि एनडीएने बहुमताचा आकडा गाठला आहे. त्याच वेळी, इंडिया आघाडीला बहुमतासाठी 40 जागा कमी आहेत.

 

आज ( 5 जून) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विविध सहकारी पक्षांनी नरेंद्र मोदी यांची आघाडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड केली. दिल्लीत झालेल्या बैठकीत 21 सदस्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यावेळी झालेल्या बैठकीत चंद्राबाबू नायडू आणि नितिश कुमारही उपस्थित होते.

 

नरेंद्र मोदींनी दोन वेळा स्वबळावरील सरकार चालवले आहे. बहुमत कमी असताना मित्रपक्षांच्या मदतीने सरकार चालवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असेल.

 

नरेंद्र मोदींना युतीचं सरकार चालवण्याचा अनुभवही नाही. गुजरातमध्ये ते मुख्यमंत्री असतानाही त्यांचं सरकार बहुमतात होतं.

 

खरं तर परिस्थिती अशी आहे की मोदींनी भाजपची सूत्रं हाती घेतल्यानंतर एनडीएतील पक्ष फुटून बाजूला जाऊ लागले. अकाली दल आणि शिवसेना हे भाजपचे जुने मित्रपक्ष होते. पण दोघेही वेगळे झाले आहेत.

 

यावेळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असताना त्यांना सरकार चालवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जावं लागणार आहे.

 

त्यांच्यासमोर चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार असणार आहेत. आणि त्यांना सोबत घेऊन जाणं ही त्यांच्यासमोरील सर्वात मोठी जबाबदारी आणि आव्हान असेल.

 

नरेंद्र मोदी दिल्लीत आल्यानंतर नितीशकुमार आणि नायडू यांच्यातील भाजपसोबतचे संबंधही खूप कटू झाले आहेत.

 

2014 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार भाजपच्या विरोधी छावणीत होते आणि या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते एनडीएमध्ये परतले.

 

नायडू आणि नितीश कुमार यांची भूमिका काय असणार?

मंगळवारी संध्याकाळी उशिरा नरेंद्र मोदींनी भाजपच्या मुख्यालयातून आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना संबोधित केलं तेव्हा त्यांनी विशेषतः चंद्राबाबू नायडू यांचा आंध्रमधील विजय आणि नितीश कुमार यांच्या बिहारमधील विजयाचा उल्लेख केला.

 

आंध्रमध्ये तेलगू देसमच्या बाजूने निकाल लागल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी ट्विटरवर लिहिलं होतं की, “आंध्रप्रदेशच्या जनतेने आम्हाला मजबूत जनादेश दिला आहे. हा जनादेश आमच्या युतीसाठी आणि राज्यातील जनतेच्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. आम्ही आंध्रप्रदेशची पुनर्बांधणी करू आणि त्याच वैभव परत आणू.”

 

चंद्राबाबू नायडू आपल्या ट्विटमध्ये एनडीए युतीबद्दल बोलले पण 12 जागा जिंकणाऱ्या नितीश कुमार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी बिहारचे भाजप अध्यक्ष सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना अनेकवेळा भेटण्याचा प्रयत्न केला पण नितीश कुमार त्यांना भेटले नाहीत. सम्राट चौधरी यांची भेट न घेण्याबाबत आणि कोणतीही प्रतिक्रिया न देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

 

विशेषत: जेव्हा सोमवारी काँग्रेस कार्यालयात अनेक नेते त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत म्हणाले – “नितीश जी सर्वांचे आहेत.” इंडिया आघडीनेही नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा आहे.

 

मात्र, मंगळवारी संध्याकाळी जेडीयूचे ज्येष्ठ नेते के.सी. त्यागी म्हणाले की, “आम्ही एनडीएसोबत होतो आणि भविष्यातही एनडीएसोबतच राहू.”

 

मोदी-नितीश-चंद्राबाबू नायडू संबंध

2002 मध्ये गुजरातमध्ये दंगल झाली तेव्हा चंद्राबाबू नायडू हे पहिले नेते होते ज्यांनी नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला होता.

 

एप्रिल 2002 मध्ये, टीडीपीने हिंसाचार थांबवण्यात आणि जातीय दंगलीतील पीडितांना मदत करण्यात अपयशी ठरल्याबद्दल मोदींच्या विरोधात एक ठरावही मंजूर केला होता.

 

आंध्रमध्ये टीडीपीला 16 जागा मिळाल्यापासून नायडू किंगमेकरच्या भूमिकेत दिसत असताना, नरेंद्र मोदी यांनी आंध्रप्रदेशात 2019 साली केलेलं भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे. या भाषणात नरेंद्र मोदींनी चंद्राबाबू नायडूंचे वर्णन “आपल्या सासऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारा” असं केलं होतं.

 

राज्यातील एका निवडणूक सभेत मोदी म्हणाले होते, चंद्राबाबू नायडू स्वतःला माझ्यापेक्षा ज्येष्ठ समजतात, तुम्ही ज्येष्ठ आहात हे चांगलंच आहे. पण पक्ष बदलण्यात तुम्ही ज्येष्ठ आहात, सासरच्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आणि आणि एकामागून एक निवडणुका हरण्यात तुम्ही ज्येष्ठ आहात.”

 

आता चंद्राबाबू नायडू एनडीएत असताना ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली जात आहे.

 

मोदी आणि शाह यांचा नायडूंवर हल्लाबोल

 

यावेळी अमित शाह यांनीही एक भाषण केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी चंद्राबाबू नायडूंचे ‘संधीसाधू’ असं वर्णन केलं आणि ‘एनडीएचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमीच बंद असतील’ असं सांगितलं.

 

पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी टीडीपी पुन्हा युतीत परतला.

 

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदींच्या या क्लिपवर प्रतिक्रिया देताना मंगळवारी ट्विट केलं की, “मला आता आश्चर्य वाटतंय की ते या व्हिडिओचं काय करतील?”

 

2018 मध्ये चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी करत एनडीएची साथ सोडली होती आणि केंद्रातील त्यांच्या दोन मंत्र्यांनाही राजीनामा द्यायला लागला होता.

 

त्यावेळी नायडू यांनी मोदी सरकारविरोधात सभागृहात अविश्वास प्रस्ताव आणला होता. हा अविश्वास प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही पण त्यांनी आपल्या 16 खासदारांसह एनडीए सोडली.

 

2019 मध्ये एनडीए सोडल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “मोदींनी पद्धतशीरपणे भारतातील प्रतिष्ठित संस्था नष्ट केल्या आहेत. भाजप सरकारच्या राजवटीत संस्थात्मक स्वायत्तता आणि लोकशाहीवर हल्ला करण्यात आला आहे.”

 

सीबीआयपासून आरबीआयपर्यंत, निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांनाही त्यांनी सोडलं नाही.

 

पण आज ते एनडीएसोबत आहेत आणि मोदींना तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी त्यांची खूप मदत होईल.

 

नितीश यांचे मोदींशी असलेले संबंध

अशाच प्रकारे म्हणजेच 2013 मध्ये साली नितीश कुमार यांनी एनडीए सोडली ती नरेंद्र मोदी यांच्यामुळेच.

 

त्यावेळी भाजपने नरेंद्र मोदींना आपल्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख बनवलं होतं. भाजप त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करेल याची कल्पना नितीश यांना नव्हती. नितीशकुमारांना हे अजिबात आवडलं नाही.

 

मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये राहिलो तर आपले मुस्लीम मतदार दुरावतील, असं नितीशकुमारांना वाटत होतं. 2013 च्या आधी म्हणजेच 2010 च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदींना बिहारमध्ये प्रचार करू दिला नव्हता. 2005 च्या बिहार विधानसभा निवडणुकीतही नितीश यांनी असंच केलं होतं.

 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षाने बिहारमध्ये स्वबळावर निवडणूक लढवली होती पण दोन जागाच निवडून आल्या.

 

2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश यांनी आरजेडीसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि मोठा विजय मिळवला. दोन वर्षांनंतर, नितीश पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने बिहारमध्ये 40 पैकी 39 जागा जिंकल्या.

 

2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष बिहारमध्ये तिसरा पक्ष बनला होता पण एनडीए सरकारमध्ये ते मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2022 मध्ये नितीश राजदसोबत आले. मात्र या वर्षी जानेवारीत ते पुन्हा भाजपसोबत गेले.

 

नितीश कुमार यांची युती सतत बदलत असते, अशावेळी पुढे काय होणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. आता 12 जागांसह नितीश यांना सोबत ठेवण्याचे नरेंद्र मोदींसमोर आव्हान असेल.

 

हे दोन पक्ष बाजू बदलतील आणि भाजपसाठी ही चिंतेची बाब ठरेल, अशी आशा विरोधकांना लागली आहे.

 

नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात असे अनेक अजेंडे आहेत, जे आघाडी सरकारमध्ये पूर्ण करणं सोपं जाणार नाही.

 

नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे वन नेशन वन इलेक्शन, एकसमान नागरी कायदा आणि सार्वजनिक उपक्रमांमधील निर्गुंतवणूक

 

यासाठी क्वचितच तयार होतील. या दोघांच्या संमतीशिवाय नरेंद्र मोदी आक्रमक आर्थिक धोरणे राबवू शकत नाहीत. एनआरसी आणि सीएए बाबतही आंदोलन वाढू शकतं.

 

नरेंद्र मोदींकडे अटलबिहारी वाजपेयीं इतका अनुभव नाही. वाजपेयींनी डझनभर पक्षांना सोबत घेऊन एनडीए सरकार चालवलं होतं आणि भाजपला आपला अजेंडा बाजूला ठेवावा लागला होता.

 

अशा स्थितीत नरेंद्र मोदींसमोर दोन पर्याय असतील. एकतर आपला अजेंडा बाजूला ठेवणं आणि दुसरं म्हणजे, सामायिक अजेंड्यासोबत पुढं जाणं

 

Published By- Priya Dixit

 

 

 

Go to Source