रिंगरोडसाठी येळ्ळूर, सुळगा परिसरात सर्व्हे सुरू

रिंगरोडसाठी येळ्ळूर, सुळगा परिसरात सर्व्हे सुरू

झाडांवर क्रमांक नोंदणी : उच्च न्यायालयातून स्थगिती न घेतल्याने निर्माण झाली समस्या
बेळगाव : येळ्ळूर, सुळगा (ये), धामणे, देसूर शिवारामध्ये रिंगरोडचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी या परिसरात पाहणी करून त्या ठिकाणी असलेल्या झाडांवर क्रमांक नोंद करत आहेत. रिंगरोड विरोधात काही मोजक्याच शेतकऱ्यांनी स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या रस्त्याच्या कामासाठी धडपडताना दिसत आहेत. हलगा-मच्छे बायपासनंतर रिंगरोडचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केला. त्यानुसार आता तालुक्यातील 32 गावांमधील जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रिंगरोडसाठी वृत्तपत्रांमधून नोटिफिकेशन देण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांच्या तक्रारी फेटाळून लावल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती घेतली आहे. मात्र काही मोजक्याच शेतकऱ्यांनी ही स्थगिती घेतल्याने भविष्यात मोठी समस्या निर्माण होणार, हे निश्चित आहे. मंगळवारी येळ्ळूर, सुळगा, देसूर, धामणे या परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी दाखल झाले होते. त्यांनी या परिसरात सर्व्हे करून झाडांवर क्रमांक नोंद केला आहे. यावेळी काही शेतकऱ्यांनी आम्ही जमीन देणार नाही, असे सांगितले. मात्र तुमच्याकडे न्यायालयातून मिळविलेल्या स्थगितीचा आदेश असेल तर दाखवा, निश्चितच आम्ही हे काम थांबवू, असे त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र संबंधित शेतकऱ्यांनी स्थगितीच घेतली नव्हती. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना अडविता आले नाही.
मोजक्याच शेतकऱ्यांकडून स्थगिती
येत्या काही दिवसांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सर्व्हे करून आता जमिनी ताब्यात घेण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत आहे. काही मोजक्याच शेतकऱ्यांनी स्थगिती घेतल्यामुळे हे काम थांबविणे शेतकऱ्यांना अवघड जाणार आहे. झाडशहापूर येथील शेतकऱ्यांनी स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे या परिसरातील सर्व्हे थांबविला होता. मात्र इतर गावातील शेतकऱ्यांनी स्थगिती घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
विरोध करण्यासाठी संघटित होणे गरजेचे
रिंगरोड करण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यापूर्वीही सर्व्हे करण्यासाठी कर्मचारी आले होते. त्यांना आम्ही पिटाळून लावले होते. मात्र आता शेतकऱ्यांनी स्थगिती मिळविली नाही. त्यामुळे हे कर्मचारी झाडांवर क्रमांक नोंदवत आहेत. त्याला विरोध केला तरी ते कायद्याच्या कचाट्यात शेतकऱ्यांना पकडत आहेत. आमचा यापुढेही या रस्त्याला विरोध राहणार, असे येळ्ळूरचे माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी यांनी सांगितले.