वास्तव महापालिका शाळांचे : ‘डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालया’ची सेमी इंग्रजीपर्यंत झेप
मनपा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर क्र.65, राजेंद्रनगझोपडपट्टीतील गरीब मुले शिक्षणाच्या प्रवाहात : 37 वर्षाच्या प्रवासात घडले अनेक विद्यार्थी : सेमी वर्गासह डिजीटल क्लासरूम व प्रयोगशाळा : वर्गखोल्या वाढविण्याची गरज : जुन्या खोल्यांचे नुतनिकरण आवश्यक
इम्रान गवंडी कोल्हापूर
राजेंद्रनगर झोपडपट्टी परिसरातील गोर-गरीब, मजुर, कष्टकऱ्यांची मुले शिक्षणापासुन वंचित राहू नयेत, त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे, मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावी, या उद्देशाने महापालिकेने येथे 01 जुलै 1987 रोजी मनपा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर क्रमांक 65 ही शाळा सुरू केली. शाळेच्या 38 वर्षाच्या कारकिर्दीत झोपडपट्टीतील मुलांना ज्ञानदानाचे कार्य केले आहे.
सुरवातीच्या काळात सुमारे 90 च्या दशकात शाळेचे चारच वर्ग भरायचे. त्यावेळचे शिक्षक मुलांना जबरदस्तीने शाळेत आणुन बसवायचे. मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबविले जायचे. पालक व विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाचे महत्व जागरूक केल्याने हळुहळू मुले शाळेत येवू लागली. शाळेची पटसंख्याही वाढू लागली. शिक्षणाची गरज लक्षात घेवून कालांतराने चौथी पर्यंत असणारी शाळा सातवीपर्यंत झाली. सन 2002 पासून पाचवी, सहावी व सातवीचे वर्ग वाढवण्यात आले. याला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत गेला.
मराठी व सेमी इंग्रजी असे दोन्ही माध्यम शाळेत असल्याने पहिले ते सातवी पर्यंत 416 इतकी पटसंख्या झाली आहे. ही संख्या दरवर्षी वाढत आहे. स्पर्धा परीक्षांबरोबरच क्रीडा स्पर्धेचेही मार्गदर्शन शाळेत केले जाते. तसेच पालकांचाही शाळेबद्दलचा उस्फूर्त प्रतिसाद दिसून येतो. शाळेमध्ये शैक्षणिकदृष्ट्या लागणारे सर्व साहित्य मुलांना मोफत दिली जातात. याची सविस्तर माहिती देत असल्याने पालकांच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये सातत्य आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना समाज कल्याण विभागाकडून प्राप्त होतात त्या विद्यार्थ्यांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो.
शाळेच्या पटसंख्येत वाढ.. सुविधा वाढविण्याची गरज
राजेंद्रनगर झोपडपट्टी म्हणजे गुन्हेगारी, मारामारी, गुंडगिरी अशीच छाप असताना येथील जागरूक नागरिकांनी शिक्षणाचे महत्व ओळखून शाळा टिकण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले आहेत. शिक्षक, सुज्ञ नागरिक, लोप्रतिनिधी, नगरसेवक, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्यामुळेच शाळा आजही टिकून आहे. शाळेचा पट दरवर्षी वाढताच आहे.
स्पर्धा परिक्षेत राज्यपातळीवर यश
दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण, विविध स्पर्धा परिक्षांमध्ये राज्य पातळीवर चमकणारी मुले, गोर गरीबांच्या मुलांना मोफत शिक्षणामुळे चौथी पर्यंत असणाऱ्या शाळेचा आज सातवी पर्यंतचा वटवृक्ष झालेला पाहायला मिळत आहे. इयत्ता पहिली पासून मराठी माध्यम असणारी शाळा 2016-17 पासून इयत्ता पहिलीपासुन सेमी वर्ग सुरू करण्यात आले.
झोपडपट्टीतील मुले शिक्षणाच्या प्रवाहात
शाळेत 416 विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. सध्या शाळेत डिजिटल क्लासरूम, संगणकीय शिक्षण, सुसज्य प्रयोगशाळा, स्मार्ट व अत्याधुनिक साधनाद्वारे ज्ञानदानाचे कार्य येथे सुरू आहे. समाजाच्या दातृत्वातून वस्तू स्वरूपात अनेकांनी मदत केल्यामुळे अनेक चांगल्या भौतिक सुविधाही विद्यार्थ्यांना मिळत आहेत. .मुलांच्या गुणवत्ता सुधारणेसह सर्वांगीण प्रगती होण्यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झोपडपट्टी परिसरात जाऊन शाळेच्या उपक्रमांची माहिती देण्याचे काम शिक्षकांकडून सातत्याने केले जाते. शिक्षणाबाबत जनजागृती करून पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम शिक्षक करतात.
37 वर्षापुर्वीच्या वर्ग खोल्यांचे नुतनिकरणाची गरज
1987 साली शाळेची स्थापना झाली तेंव्हा पहिली ते चौथी पर्यंतचे चार वर्ग खोल्यांचे दगडी बांधकाम करण्यात आले होते. नंतर सातवी पर्यंतसाठी नवीन इमारत बांधण्यात आली. पण जुने बांधकाम तसेच आहे. त्याच्या नुतनिकरणाची गरज आहे.
सीसीटीव्ही आवश्यकच
रात्रीच्यावेळी काहीवेळा मद्यपींचा वावर असतो. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सीसीटीव्ही बसविण्याची गरज आहे. मैदानाचे सपाटीकरण होणे आवशयक आहे.
बोअरला मोटर बसविल्यास पाण्याचा प्रश्न निकाली
शाळेच्या कंपाऊंड लगत जुना बोअर बंद स्थितीत आहे. बोअरला मोटर बसविल्यास शाळेचा पाण्याचा प्रश्न कायस्वरूपी निकाली निघेल. कंपाऊं रंगविण्याची आवश्यकता आहे. वाढत्या पटसंख्येचा विचार करता प्रशासनाने मुलभुत सुविधांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शाळेचे वर्ग खोल्या वाढविण्याची गरज
शाळेचे बांधकाम जुने झाले आहे. दर्जेदार शिक्षणामुळे मुलांची संख्या वाढत आहे. सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांचा ओढा वाढला आहे. वाढती विद्यार्थी संख्या लक्षात घेता नवीन चार वर्ग खोल्या वाढविण्याची गरज आहे.
नंदा सचिन नवगिरे, अध्यक्षा, शाळा व्यवस्थापन समिती
विद्यार्थ्यांच सर्वांगीण विकास हेच ध्येय
आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून संवेदनशील विद्यार्थी घडवणे त्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच शाळेचे पहिल्यापासून ध्येय आहे. हिच परंपरा कायम जपत सर्वच शिक्षक कसोशीने प्रयत्न करतात. सर्व शिक्षक, पालक व परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधींच्या अविरत प्रयत्नामुळे मनपा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेची एक आदर्श शाळा ओळख निर्माण झाली आहे.
उत्तम पांडुरंग गुरव, मुख्याध्यापक