मागील वर्षापेक्षा यंदा जलाशयांमध्ये पाणी अधिक

मागील वर्षापेक्षा यंदा जलाशयांमध्ये पाणी अधिक

हिडकल जलाशयात 23.870 टीएमसी, आलमट्टी जलाशयात 22.515 टीएमसी पाणी, तरीही पाणी जपून वापरण्याचे आवाहन
बेळगाव : यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जलाशयामधील पाण्याचा विसर्ग करताना काळजी घ्या, अशी सूचना प्रादेशिक आयुक्तांनी पाटबंधारे खात्याला दिली होती. त्यामुळे पाऊस कमी झाला तरी जिल्ह्यातील जलाशयांमध्ये मागील वर्षापेक्षा यावर्षी पाण्याचा साठा अधिक प्रमाणात असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. याचबरोबर उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे जलाशय असलेल्या आलमट्टी जलाशयामध्येही मागील वर्षीपेक्षा 5 टीएमसी पाणी अधिक असल्याचे सांगण्यात आले. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयामध्येही यावर्षी अधिक प्रमाणात पाणीसाठा आहे. मागील वर्षी 13.250 टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी 23.870 टीएमसी पाणीसाठा आहे. सध्या 98 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नविलतीर्थ जलाशयामध्ये मागील वर्षापेक्षा यावर्षी पाणीसाठा काहीसा कमी आहे. मागील वर्षी 9.046 पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी 7.018 टीएमसी पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले. सध्या या जलाशयामधून 194 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हिप्परगी बॅरेज जलाशयाने मात्र यावर्षीही तळ गाठला असून केवळ 0.32 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याचे थांबविण्यात आले आहे. एकूणच पाणी जपून वापरण्याचा संदेश दिल्याप्रमाणे पाण्याचा वापर केला जात आहे. उत्तर कर्नाटकातील मोठे जलाशय असलेल्या आलमट्टी जलाशयामध्ये 22.515 टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी यावेळी तो 17.060 टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे मागील वर्षापेक्षा 5 टीएमसीहून अधिक पाणीसाठा असल्याचे दिसून येत आहे. या जलाशयातून दररोज आता 3 हजार 576 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
शेतीलाही मोजकेच पाणी
यामधील काही जलाशयांचा पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही वापर केला जातो. शेतीलाही मोजकेच पाणी सोडण्यात येत आहे. मार्च संपत आहे. त्यामुळे एप्रिल-मे मध्ये मात्र वळीव पाऊस झाला नाही तर ही सर्व जलाशये तळ गाठणार असे दिसून येत आहे. सध्या जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग मोजक्याच प्रमाणात केला जात आहे. वळीव पाऊस झाल्यास सर्वांनाच दिलासा मिळणार आहे. अन्यथा मे मध्ये पाण्याची समस्या गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त होत आहे.