फुटबॉल जगतातला बाप ‘आऊट’ झाला….

फुटबॉल जगतातला बाप ‘आऊट’ झाला….

यशवंत कातवरे यांचा चटका लावणारा मृत्यू
► सुधाकर काशीद
कोल्हापूर
कोल्हापूरच्या फुटबॉल जगताची असंख्य एकापेक्षा एक वेगळी वैशिष्ट्यो आहेत. त्यातलेच एक वैशिष्ट्या म्हणजे बाप लेक दोघेही एकाच फुटबॉल संघात आणि दोघेही इर्षेबाज. या दोघा बाप-लेकांनी शाहूपुरी फुटबॉल क्लबकडून खेळताना आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला आणि यातला बाप आज आयुष्याच्या मैदानातूनच आऊट झाला. शाहूपुरी फुटबॉल संघाचे व वयाच्या साठ वर्षापर्यंत त्या संघाकडून चमकदार फुटबॉल खेळणारे यशवंत ऊर्फ दादा कातवरे .(वय 92) यांचे आज पहाटे निधन झाले. ते व त्यांचा मुलगा दीपक हे सलग अकरा वर्षे शाहूपुरी फुटबॉल संघाकडून एकत्र खेळत होते. केवळ या बाप-लेकांचा खेळ पाहण्यासाठी कोल्हापूरकर शाहूपुरीची मॅच असली की मैदानावर गर्दी करत होते.
यशवंत ऊर्फ दादा कातवरे हे एक अजब रसायन होते. फुटबॉल खेळाची घरात, परिसरात कोणतीही पार्श्वभूमी नाही. पण शाहू स्टेडियमवर फुटबॉल सामने पाहण्यासाठी ते 40  वर्षापासून शाहू स्टेडियमवर येत होते. त्यांची ही फुटबॉलची आवड त्यांना फक्त मॅच बघण्यापूर्वी मर्यादित नव्हती. त्यामुळे त्यांनी ते राहत असलेल्या शाहूपुरी परिसराचा संघ काढायचे ठरवले. भोला सांगवडेकर, बाबू सांगवडेकर व अन्य खेळाडूंच्या सहकार्याने शाहूपुरी फुटबॉल संघाची त्यांनी सुरुवात केली. पायात बूट नाही, कीट नाही, अशा परिस्थितीत पट्ट्या-पट्ट्याच्या चड्डीवर त्यांनी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या खडबडीत पटांगणावर सराव सुरू केला. घोटे, गुडघा, पिंढऱ्या रोज फुटायच्या. पण फुटबॉलचे वेड एवढे की त्यांच्या वेदना खेळाच्या आवडीमुळे दबून जायच्या.
दादा  व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाहूपुरीचा संघ कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वात मुख्य प्रवाहात आणला. साधारणत: 1991 साली त्यांचा मुलगा दीपक ही शाहूपुरी संघाकडून खेळू लागला. बाप लेक एकाच फुटबॉल संघाकडून खेळणे ही नक्कीच औत्सुक्याची घटना होती. हे बाप-लेक दोघेही बचाव फळीत असायचे. उंचावरून आलेला कोणताही बॉल यशवंत दादा हेडने परतवायचे. अनेक जण त्यांना अशी हेड मारू नका, मानेला इजा होईल, असे सांगायचे. पण यशवंत दादा वयाच्या साठ वर्षापर्यंत आपल्याच शैलीत खेळत राहिले. मुलगा दीपक पास घेताना जरा जरी चुकला तर त्याला भर मैदानावर रागवत राहिले. खेळताना धसमुसळेपणा करायचा नाही, आडवा पाय घालायचा नाही, हे संघातल्या सर्व खेळाडूंना वेळोवेळी ते बजावत राहिले. कोल्हापुरातल्या केवळ शाहूपुरी संघापुरतेच नव्हे तर इतर सर्व फुटबॉल संघातही ते त्यामुळे आदरास पात्र राहिले. त्यांचे वय 60 झाल्यानंतर त्यांनी खेळ थांबवला. पण फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी शाहू स्टेडियमवरती येतच राहिले. वय झाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय त्यांना दुचाकी चालवण्यास देत नव्हते. त्यामुळे ते हळूहळू चालत रोज स्टेडियमवर येत होते. वय 92 असले तरी त्यांची प्रकृती व्यवस्थित होती. आज पहाटे झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचे निधन झाले. त्यांच्यासोबत खेळणारा त्यांचा मुलगा दीपक कातवरे कोल्हापूर महापालिकेत नोकरीस आहे.