अन्यथा जिल्हा बँकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन

अन्यथा जिल्हा बँकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन

– आंदोलन अंकुशचा इशारा : प्रलंबित प्रोत्साहनपर अनुदान तत्काळ देण्याची मागणी
– पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन
► प्रतिनिधी
कोल्हापूर
प्रोत्साहनपर अनुदानास पात्र असूनही अद्याप काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे प्रलंबित राहिलेले हे अनुदान तत्काळ देण्यात यावे. पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा न झाल्यास जिल्हा बँकेसमोर बेमुदत धरणे आदोलन करण्याचा इशारा आंदोलन अंकुशच्या शिष्टमंडळाने दिला. यासंदर्भातील निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले.
जिल्हा बँकेच्या शाहूपुरी येथील प्रधान कार्यालयामध्ये आंदोलन अंकुशच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत प्रोत्साहनपर अनुदानाबाबत चर्चा करत विविध मागण्यांचे निवेदन दिले.
याप्रसंगी बोलताना आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे म्हणाले, पीक कर्जाची नियमित परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते. मात्र यामधील अटी व नियमांमुळे बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे केणतेही निकष न लावता नियमित कर्जफेड करणाऱ्या सर्व शेतक्रयांना हे अनुदान देण्यात यावे. मयत वारस शेतकऱ्यांनाही लाभ देण्यात यावा.
यातील काही अपात्र शेतकऱ्यांना नवीन शासन आदेशानुसार पात्र ठरवले गेले. पण त्या पात्र शेतकऱ्यांना अद्याप अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत. निवडणुकीची आचार संहिताही आता संपली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना तत्काळ अनुदानाचे पैसे देण्यात यावे, अशी मागणी चुडमुंगे यांनी केली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पंधरा दिवसात शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
यावेळी आंदोलन अंकुशचे दिपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, रशीद मुल्ला, महेश जाधव, संभाजी माने, सोमनाथ तेली, सुरेश चुडापा, अकबर पटेल, दादासो मुसळे, अभय इंगळे, हिराबाई कामते आदी उपस्थित होते.