पारिश्वाड ईदगाह मैदानाबाबत समाजबांधव दाद मागणार

पारिश्वाड ईदगाह मैदानाबाबत समाजबांधव दाद मागणार

महसूल खात्यातील कागदपत्रात फेरफार करून जमिनीची विक्री केल्याने संभ्रम : मुस्लीम बांधव आंदोलनाच्या तयारीत
खानापूर : खानापूर तालुक्यातील पारिश्वाड येथील ईदगाह मैदानाच्या महसूल खात्यातील कागदपत्रात फेरफार करून जमिनीची विक्री केल्याने पारिश्वाडसह या ईदगाह मैदानाच्या संबंधित 12 गावच्या मुस्लीम समाजातील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, याबाबत महसूल खात्याच्या गैरकारभाराबाबत वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे जाहीर करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत पारिश्वाड येथील मुस्लीम समाजाचे ज्येष्ठ नागरिक बसीर नंदगड, बाबालाल बेपारी, गु•sसाब बेपारी, अन्वर बेपारी, दादाफिर सनदी, यासीम मुजावर, सिंकदर सनदी, गौस सनदी यासह इतर नागरिकांनी भारत लाईव्ह न्यूज मीडियाशी बोलताना सांगितले की, पारिश्वाड येथील सर्व्हे क्रमांक 21 मधील 4 एकर 12 गुंठे ही जमीन गेल्या शेकडो वर्षांपासून पारिश्वाड परिसरातील भेंडगिरी, हिरेहट्टीहोळी, हिरेमुन्नोळी, चिक्कहट्टीहोळी, कग्गणगी, देवलत्ती, बडस, लक्केबैल, लोकोळी, भंडरगाळी, बरगाव, बडस क्रॉस अशा 12 गावच्या मुस्लीम समाजाच्या  प्रार्थनेसाठी वापरण्यात येत होती. पूर्वी सर्व 12 गावच्या समाजबांधवांनी एका नावावर नोंदणी करण्यात आली होती. या ठिकाणी 12 गावच्या मुस्लीम समाजाच्या सणाच्यावेळी नमाज पठणासाठी तसेच इतर धार्मिक कार्यक्रमासाठी ही जागा गेल्या शेकडो वर्षापासून वापरण्यात येत आहे. असे असताना संबंधित कुटुंबाच्या वारसदारानी महसूल खात्याच्या अधिकाऱ्याना हाताशी धरून जमिनीच्या कागदपत्रात फेरफार करून विक्री केल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत इदगाहच्या संबंधित गावातील नागरिकांनी आवाज उठविला आहे.
महसूल खात्याच्या वरिष्ठांकडे तक्रार
महसूल खात्याच्या वरिष्ठांकडे याबाबत तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीची दखल घेत तहसीलदारांनी महसूल अधिकाऱ्यांना संबंधित जागेचे सर्वेक्षण करून अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. महसूल अधिकारी शशीकांत टक्केकर यांनी पारिश्वाड येथील इदगाह परिसराला भेट देवून पाहणी केली असता यावेळी ईदगाह संबंर्धित 12 गावच्या नागरिकांनी उपस्थित राहून महसूल अधिकारी टक्केकर यांना इदगाह संबंधित वापराची आणि कागदपत्रांची सविस्तर माहिती दिली.
खरेदी रद्द करण्याची मागणी
यावेळी उपस्थितांनी इदगाह मैदानाची जागा ही समाजाची असून या जागेवर संपूर्ण 12 गावातील मुस्लीम समाजाचा हक्क असून सदर खरेदी रद्द करण्यात यावी आणि जसे पूर्वी ईदगाह मैदान म्हणून नमूद होते. त्याप्रमाणे महसूल खात्याच्या कागदोपत्री नमूद करण्यात यावे, अशी मागणी मुस्लीम समाजाच्या नागरिकांनी केली आहे.
कायद्याच्या चौकटीत निर्णय
याबाबत महसूल अधिकारी शशीकांत टक्केकर यांना विचारले असता ते म्हणाले, वरिष्ठांच्या आदेशानुसार संबंधिताना नोटीस देवून या जागेची पाहणी केली होती. मात्र खरेदी देणारे यावेळी उपस्थित नव्हते. यावेळी इदगाह संबंधिच्या 12 गावच्या नागरिकांनी आपले म्हणणे सांगितले असून तसा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे दिलेला आहे. संबंधित जागेची खरेदी ही नोंदणी खात्याकडून झाली आहे. याबाबत तक्रारदारांच्या अर्जानुसार आम्ही नाव दाखल थांबवलेले आहे. चौकशीनंतरच कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.