हलगा-मच्छे बायपासच्या कामाला सुरुवात

हलगा-मच्छे बायपासच्या कामाला सुरुवात

सपाटीकरण करणे तसेच खडी टाकण्याचे काम युद्धपातळीवर : शेतकऱ्यांचाही विरोध बऱ्याच अंशी मावळला
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्यावरील स्थगिती उच्च न्यायालयाने उठविल्यानंतर कंत्राटदाराने या रस्त्याच्या कामाला गुरुवारी जोरदार सुरुवात केली आहे. येळ्ळूर रस्त्याजवळील चर बुजवून खडी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तातडीने हे काम पूर्ण करण्यासाठी आता कंत्राटदार जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. अलारवाड क्रॉस ते मच्छेपर्यंत हा रस्ता करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. रस्त्यावरील लढाईबरोबरच न्यायालयीन लढा दिला. मात्र शेतकऱ्यांतील दुफळीमुळे काही जणांनी न्यायालयातून माघार घेतली. त्यामुळे याचा फटका इतर शेतकऱ्यांना बसला आहे. परिणामी न्यायालयानेही या रस्त्यावरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराची धडपड सुरू झाली आहे.
उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी स्थगिती उठविली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कंत्राटदाराने यंत्रसामुग्री दाखल केली. त्यानंतर आता गुरुवारपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. न्यायालयाने स्थगिती उठविल्यामुळे आता शेतकऱ्यांचाही विरोध बऱ्याच अंशी मावळला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मूळ दाव्याला न्यायालयाने स्थगिती दिली असून सुरू असलेले काम हे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. झिरो पॉईंटचा मुद्दा धरून शेतकऱ्यांनी या रस्त्याविरोधात लढा दिला. त्यानंतर अनेकवेळा कंत्राटदारानेही दडपशाही करत हा रस्ता करण्याचा प्रयत्न केला होता. न्यायालयात धाव घेवून शेतकऱ्यांनी स्थगिती घेतली होती. पण काही शेतकऱ्यांनी त्यामधून माघार घेतल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. यापुढेही आम्ही लढा लढणार असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र तोपर्यंत हा रस्ता कंत्राटदार पूर्ण करण्याच्या तयारीला लागला आहे.
शेतकऱ्यांनी विरोध करताच काम थांबविले
न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत दाखवा व त्यानंतरच कामाला सुरुवात करा, असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला. त्यामुळे कंत्राटदाराने सायंकाळी काम थांबविले. आमच्याकडे तुम्ही न्यायालयाची प्रत मागता, तुम्ही मात्र का देत नाही? असे शेतकरी रमाकांत बाळेकुंद्री यांनी कंत्राटदाराला सुनावले. कंत्राटदाराकडे प्रत नसल्याने नाईलाजास्तव काम थांबवावे लागले आहे.