दहशतवाद आणि चर्चा एकत्र अशक्य !

वृत्तसंस्था / नवी दिल्ली दहशतवाद आणि चर्चा यांचे सहअस्तित्व अशक्य आहे, असे प्रतिपादन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे त्यांनी यासंबंधीच्या त्यांच्या भूमिकेत परिवर्तन केल्याचे दिसून येते, असे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले. आजवर त्यांनी दहशतवाद सुरु राहिला तरी, पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे अशी भूमिका घेतली होती. पाकिस्तानला भारताशी […]

दहशतवाद आणि चर्चा एकत्र अशक्य !

वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दहशतवाद आणि चर्चा यांचे सहअस्तित्व अशक्य आहे, असे प्रतिपादन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे त्यांनी यासंबंधीच्या त्यांच्या भूमिकेत परिवर्तन केल्याचे दिसून येते, असे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले. आजवर त्यांनी दहशतवाद सुरु राहिला तरी, पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे अशी भूमिका घेतली होती.
पाकिस्तानला भारताशी चांगले संबंध हवे असतील, तर त्या देशाने दहशतवादाचा मार्ग सोडावयास हवा. दहशतवादी संघटनांनीही हिंसेचा मार्ग सोडून देणे आवश्यक आहे. दहशतवादाचा मार्ग सोडण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दबाव आणणे हा एकमेव मार्ग आहे. पाकिस्तानने आता हा विनाशाचा मार्ग सोडून द्यावा असे आवाहन अब्दुल्ला यांनी मंगळवारी केले.
हल्ल्यानंतर प्रतिपादन
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे सोमवारी पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांनी भारताच्या सैनिक चौकीवर हल्ला करुन पाच सैनिकांचे बळी घेतले होते. त्या संदर्भात अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. या हल्ल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात शोध अभियान हाती घेण्यात आले आहे. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना सोडले जाणार नाही. त्यांना त्यांच्या कृत्याची किंमत भोगावी लागेल, असा इशारा केंद्र सरकारनेही दिला आहे. भारतात दहशतवादी घुसविणे आणि हिंसाचाराच्या माध्यमातून भारतावर दबाव आणणे हे तंत्र आता उपयोगी पडणार नाही. त्यामुळे कोणतीही समस्या सुटणार नाही, असे अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले.
एकत्र प्रयत्न करा
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकत्रितरित्या दहशतवाद संपविण्यासाठी प्रयत्न करावेत. मैत्रीच्या आणि शांततापूर्ण वातावरणातच प्रगती शक्य आहे, हे आपल्या शेजारी देशाने आता लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा त्या देशाचीही अधिक हानी होणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.