भारताचा द.आफ्रिकेवर 10 गड्यांनी दणदणीत विजय

भारताचा द.आफ्रिकेवर 10 गड्यांनी दणदणीत विजय

टी-20 मालिका बरोबरीत, सामनावीर, मालिकावीर पूजा वस्त्रकरचे 4 बळी, मानधनाचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था/चेन्नई
स्मृती मानधनाचे नाबाद अर्धशतक तसेच तिने शेफाली वर्मासमवेत नोंदविलेली अभेद्य 88 धावांची भागिदारी, पूजा वस्त्रकरची भेदक गोलंदाजा यांच्या जोरावर यजमान भारतीय महिला क्रिक्रेट संघाने मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात द. आफ्रिकेचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव करत तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. तर दुसरा सामना पावसामुळे वाया गेल्याने द. आफ्रिकेने मालिकेत आघाडी घेतली होती. भारताला मालिका बरोबरीत राखण्यासाठी मंगळवारच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात विजयाची नितांत गरज होती. भारतीय महिला संघाने सर्वच विभागात दर्जेदार कामगिरी करत विजय मिळविल्याने द. आफ्रिका संघाला मायदेशी परतण्यापूर्वी एकही मालिका जिंकता आली नाही.
मंगळवारच्या शेवटच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. पूजा वस्त्रकर आणि राधा यादव यांच्या शिस्तबध्द आणि भेदक गोलंदाजीसमोर द. आफ्रिकेची फलंदाजी कोलमडली. 17.1 षटकात द. आफ्रिकेचा डाव 84 धावांत आटोपला. द. आफ्रिकेच्या डावातील पहिल्या चार षटकामध्ये कर्णधार कौरने 4 विविध गोलंदाजांना गोलंदाजीची संधी दिली होती. कर्णधार वूलव्हार्ट आणि ब्रिटस् यांनी 3.2 षटकात 19 धावांची भागिदारी केली. श्रेयांका पाटीलने चौथ्या षकटात वूलव्हार्टला रे•ाrकरवी झेलबाद केले. तिने 2 चौकारांसह 9 धावा जमविल्या. ब्रिटस् आणि कॅप या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 11 धावांची भर घातली. पूजा वस्त्रकरने कॅपला शेफाली वर्माकरवी झेलबाद केले. पूजा वस्त्रकरचा हा टी-20 प्रकारातील 50 वा बळी ठरला. त्यानंतर दीप्ती शर्माने ब्रिटस्ला कौरकरवी झेलबाद केले. तिने 23 चेंडूत 3 चौकारासह 20 धावा जमविल्या. कॅपने 8 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा केल्या. तर बॉशने 14 चेंडूत 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. द. आफ्रिकेच्या डावात 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. 8 व्या षटकाखेर द. आफ्रिकेने 3 बाद 45 धावा जमविल्या होत्या. या षटकात दीप्तीने ट्रायोनला जीवदान दिले होते. 11 व्या षटकात द. आफ्रिकेने 2 गडी गमविले त्यावेळी त्यांची धावसंख्या 61 होती. द. आफ्रिकेचा निम्मा संघ 61 धावांत बाद झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उर्वरित 5 गडी केवळ 23 धावांत गुंडाळले. द. आफ्रिकेच्या डावात 10 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे पूजा वस्त्रकरने 13 धावांत 4 तर राधा यादवने 6 धावांत 3 गडी बाद केले. रे•ाr, श्रेयांका पाटील आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 39 धावा जमविताना 2 गडी गमविले. 10 षटकांत द. आफ्रिकेने 3 बाद 57 धावांपर्यंत मजल मारली. द. आफ्रिकेचे अर्धशतक 55 चेंडूत नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 10.5 षटकात बिनबाद 88 धावा जमवित हा सामना 55 चेंडू बाकी ठेवून 10 गड्यांनी जिंकला. स्मृती मानधनाने डी क्लर्कच्या चेंडूवर विजयी षटकार खेचला. शेफाली वर्माने 25 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 27 तर स्मृती मानधनाने 40 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 54 धावा झळकविल्या. भारताच्या डावात 2 षटकार आणि 11 चौकार नेंदविले गेले. भारताने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 40 धावा जमविल्या. भारताचे अर्धशतक 42 चेंडूत पूर्ण झाले. मानधनाने आपले अर्धशतक 39 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने झळकविले.
संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका: 17.1 षटकात सर्व बाद 84 (ब्रिटस् 20, वूलव्हार्ट 9, कॅप 10, बॉश 17, अवांतर 2, वस्त्रकर 4-13, राधा यादव 3-6, रे•ाr 1-14, पाटील 1-19, शर्मा 1-21), भारत 10.5 षटकात बिनबाद 88 (शेफाली वर्मा 25 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 27, स्मृती मानधना 40 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 54, अवांतर 7)