तालुका पंचायत साहाय्यक संचालकांना निलंबित करा

तालुका पंचायत साहाय्यक संचालकांना निलंबित करा

सेवा बजावताना अनेक गैरकारभार केल्याचा ठपका
बेळगाव : बेळगाव तालुका पंचायतीचे साहाय्यक संचालक गणेश के. एस. यांनी यापूर्वी विविध ठिकाणी सेवा बजावताना अनेक गैरकारभार केले आहेत. त्यांना सेवेतून त्वरित निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करत डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघातर्फे जिल्हा पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. गणेश के. एस. हे सध्या बेळगाव तालुका पंचायतीमध्ये साहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी खानापूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. 2010 ते 2020-21 कालावधीमध्ये त्यांनी नंदगड, हेब्बाळ, कसबा-नंदगड, बीडी ग्रा. पं. मध्ये. ग्रा. पं. विकास अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. सदर सेवा काळामध्ये सरकारी निधीचा दुरुपयोग केला आहे. विविध विकासकामे राबविताना खर्चाची बिले न लावताच बिले काढली आहेत. या संदर्भातील कोणतेच पुरावे सादर न करता निधीचा गैरवापर केला आहे. त्यांना त्वरित सेवेतून निलंबित करण्यात यावे व सरकारच्या निधीमध्ये झालेला गैरकारभार याची चौकशी करून सदर निधी सरकारला जमा करण्यात यावा, अशी मागणी करत शक्ती संघातर्फे जि. पं. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.