जि.पं.सभागृह उद्घाटन लांबणीवर

जि.पं.सभागृह उद्घाटन लांबणीवर

बेळगाव : जिल्हा पंचायत सभागृहाचे नुकताच नूतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सदर सभागृहाचे दि. 12 रोजी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, सदर उद्घाटन पुन्हा लांबणीवर टाकण्यात आले आहे. जिल्हा पंचायत सभागृहाला गळती लागल्याने ठिकठिकाणी छत खराब झाले होते. सभागृह मोठे असूनही माईक व्यवस्था नसल्या कारणाने जि. पं. सदस्यांना बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांशी संवाद साधणे कठीण जात होते. शिपायांना माईक घेऊन पळापळ करावी लागत होती. त्यामुळे मोठी गैरसोय झाली होती. याची दखल घेऊन सभागहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सभागृहाचा चेहरामोहरा बदलण्यात आला आहे. सभागृहात प्रत्येक आसनावर माईक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वीची माईक व्यवस्था बदलून त्या ठिकाणी नवीन साऊंड सिस्टिम बसविण्यात आली आहे. तसेच एसी सुविधाही बसविण्यात आली आहे.बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांकडून सादर केल्या जाणाऱ्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सोयीचे ठरेल या दृष्टीने प्रोजेक्टर स्क्रीन बसविण्यात आली आहे. व्यासपीठासह समोरील कार्पेट बसवून नवीन लूक देण्यात आला आहे. सदर सभागृहाचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, काही कारणांमुळे हे उद्घाटन लांबणीवर पडले आहे.