काँग्रेसची सहावी यादी केवळ 5 उमेदवारांची

काँग्रेसची सहावी यादी केवळ 5 उमेदवारांची

राजस्थानमधील चार, तामिळनाडूतील एक नाव जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसने सोमवारी लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली. होळीच्या दिवशी आलेल्या या यादीत एकूण पाच नावे समाविष्ट असून त्यामध्ये राजस्थानमधील चार आणि तामिळनाडूमधील एका उमेदवाराचा समावेश आहे. तिरुनेलवेल्ली लोकसभा मतदारसंघातून अॅड. सी रॉबर्ट ब्रुस यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त तामिळनाडू विधानसभा जागा क्रमांक 233 विलावनकोड येथील पोटनिवडणुकीसाठी डॉ. थरहाई कुथबर्ट यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे.
राजस्थानमधील लोकसभेच्या आणखी चार जागांसाठी काँग्रेसने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यापैकी प्रल्हाद गुंजल यांना कोटा येथून तिकीट देण्यात आले आहे. गुंजल यांनी नुकताच भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कोटा व्यतिरिक्त काँग्रेसने भिलवाडा, राजसमंद आणि अजमेरमध्येही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये भिलवाडामधून दामोदर गुर्जर, अजमेरमधून रामचंद्र चौधरी आणि राजसमंदमधून सुदर्शन रावत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रल्हाद गुंजल यांच्या उमेदवारीमुळे कोटामधील लढत रंजक बनली आहे. प्रल्हाद गुंजल हे यापूर्वी 2013 ते 2018 या काळात कोटा उत्तरमधून भाजपचे आमदार होते. याआधी 2003 ते 2008 पर्यंत ते कोटा जिह्यातील रामगंजमंडी येथून आमदार होते. दबंग प्रतिमा असलेले गुर्जर नेते गुंजल यांनी यापूर्वी कोटा उत्तरचे आमदार आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्या शांती धारीवाल यांच्याशी निवडणूक लढवली आहे. कोटामधून लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या गुंजल यांनी नुकताच भाजप सोडला होता.
कोटामध्ये बिर्ला विरुद्ध गुंजल
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला कोटामधून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. आता त्या अंदाजाचे वास्तवात ऊपांतर झाले. कोटामध्ये भाजपने दोन वेळा खासदार आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उमेदवारी दिली आहे. आता गुंजल आणि बिर्ला यांच्यातील निर्णायक लढत होणार आहे.