श्रीकृष्णांनी अलिप्त राहून, समाधानाने वागून दाखवले
अध्याय एकतिसावा
श्रीकृष्णमहात्म्य सांगताना शुकमुनी म्हणाले, श्रीकृष्ण जर येथेच राहिले असते तर साधक त्यांच्या सगुणरुपाच्या ध्यानात अडकून पडले असते. श्रीकृष्णांचे ध्यान केल्याने विषयसेवन बाधत नाही हे लक्षात आल्यावर त्यांचे ध्यान करून जर ते निर्धास्तपणे विषयसेवन करत राहिले असते तर त्यांचा अभिमान वाढला असता आणि त्यांना आत्मज्ञान झाले नसते. आत्मज्ञान न झाल्याने श्रीकृष्णनाथ देही असून विदेहीपणे कसे रहात होते हे साधकांना न समजल्याने त्यांना देही असून विदेही अवस्था अनुभवता आली नसती. त्यांचे सदेह दर्शन घेतल्या घेतल्या सर्व भक्तांचे, साधकांचे मन निवत असे. असे जरी असले तरी त्यांचा देहही मिथ्या म्हणजे कधी ना कधी नाश पावणारा आहे हे लोकांच्या लक्षात यावे ह्या उद्देशाने श्रीकृष्णनाथांनी निजधाम जवळ केले. थोडक्यात लोकांचा देहाभिमान नष्ट करण्यासाठी श्रीकृष्णांनी निजधामाला गमन केले हे स्पष्ट आहे. दृढ वैराग्य धारण करून देहाभिमानाच्या तावडीतून सुटका करून घ्यावी आणि निजात्मस्थिती प्राप्त करून घ्यावी ही दीक्षा सर्व साधकांना देऊन श्रीपती निघून गेले. जो सगळ्यातून अलिप्त असतो त्याला कधीही दुषण लागत नाही. अलिप्त असल्याने त्याला कोणाबद्दल ममत्व किंवा आसक्ती वाटत नसल्याने त्याला कोणतीही इच्छा होत नाही की, तो कुणाकडून कसलीही अपेक्षा करत नाही. त्यामुळे प्रारब्धानुसार वाट्याला आलेले सुखोपभोग भोगूनसुद्धा त्याला कोणतेही बंधन लागू होत नाही. श्रीकृष्णनाथही सर्व संसारातून अलिप्त असल्याने त्यांनी राजा म्हणून, पती म्हणून अनेक सुखाचा उपभोग घेतलेला असला तरी त्यांना त्याचा कसलाही लेप लागला नाही. आत्मज्ञानी मनुष्य असाच पूर्ण असतो. समोर दिसणारे जग हा आभास आहे ह्याची त्याला खात्री झालेली असते. त्यामुळे तो सदा ब्रह्मचारी असतो. प्रपंच करत असला, त्याला स्त्राrपुत्र असले तरी तो नित्य संन्यासी असतो. एखाद्या गोष्टीवर मनुष्य मालकी हक्क गाजवायला गेला की, त्याला त्या गोष्टीपासून अपेक्षा निर्माण होतात पण जो ईशावास्योपनिषदात सांगितल्याप्रमाणे असे समजतो की, सध्या आपल्याकडे असलेली वस्तू ही मुळात ईश्वराच्या मालकीची असून त्याने ती आपल्याला काही काळ वापरायला दिलेली आहे त्याला ती गोष्ट स्वत:ची वाटत नसल्याने ती कायम आपल्याजवळ असावी असे वाटत नसते. त्यामुळे कालांतराने ती वस्तू नाहीशी झाली किंवा दुसऱ्याने नेली तरी त्याला वाईट वाटत नाही. तिचा आणि आपला संबंध तेव्हढाच होता असे समजून तो शांत राहतो. साहजिकच वस्तू असताना त्याला सुख वाटत नाही की, ती गेल्यावर तो दु:खी होत नाही. वरील उपनिषदात सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांनी ह्या अवतारात सगळ्यापासून अलिप्त राहून, समाधानाने वागून दाखवले. स्वत: जरी आत्मज्ञानी असले तरी कोणतेही काम करायला त्यांना कमीपणा वाटला नाही. गोकुळात असताना सगळ्या गवळीवाड्याचे स्वामित्व त्यांच्याकडे होते, त्याचा त्यांना कधी अभिमान वाटला नाही किंवा स्वामी असूनही गायींची सेवा करावी लागते म्हणून त्यांना कधी दु:ख झाले नाही. स्वत: द्वारकाधीश असून त्यांनी अनेकांची सेवा केली. राजसूय यज्ञात आलेले पाहुणे जेवल्यानंतर त्यांची उष्टीखरकटी काढण्याचे काम त्यांनी आनंदाने पत्करले होते. महाभारतीय युद्धात त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता अर्जुनाचे सारथ्य करायचे कबूल केले. सारथी म्हणून अर्जुनाच्या रथाची घोडी धुताना त्यांनी कधी कमीपणा मानला नाही. हे सर्व करूनसुद्धा त्यांच्या पूर्णत्वाला कधी बाधा आली नाही. आपल्या सद्गुरूंचा मेलेला पुत्र परत आणताना किंवा आपल्याच कुळाचे निर्दालन करताना त्यांच्या आत्मज्ञानात कधीही उणीव आली नाही. आपले ब्रीद जपण्यासाठी आवश्यकतेनुसार कुणाचा पूर्ण कैवार घेतला तर कुणाशी कट्टर वैर घेतले पण असं जरी असलं तरी सगळ्यांशी असलेली त्यांची एकात्मता अणुभरही ढळली नाही.
क्रमश:
Home महत्वाची बातमी श्रीकृष्णांनी अलिप्त राहून, समाधानाने वागून दाखवले
श्रीकृष्णांनी अलिप्त राहून, समाधानाने वागून दाखवले
अध्याय एकतिसावा श्रीकृष्णमहात्म्य सांगताना शुकमुनी म्हणाले, श्रीकृष्ण जर येथेच राहिले असते तर साधक त्यांच्या सगुणरुपाच्या ध्यानात अडकून पडले असते. श्रीकृष्णांचे ध्यान केल्याने विषयसेवन बाधत नाही हे लक्षात आल्यावर त्यांचे ध्यान करून जर ते निर्धास्तपणे विषयसेवन करत राहिले असते तर त्यांचा अभिमान वाढला असता आणि त्यांना आत्मज्ञान झाले नसते. आत्मज्ञान न झाल्याने श्रीकृष्णनाथ देही असून विदेहीपणे […]