शेअरबाजार नव्या विक्रमासह तेजीसमवेत बंद

शेअरबाजार नव्या विक्रमासह तेजीसमवेत बंद

सेन्सेक्स 66 अंकांच्या तेजीसोबत बंद, आयशर मोटर्स घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजार काहीशा तेजीसोबत बंद होण्यात यशस्वी झाला आहे. यामध्ये एनटीपीसी ही कंपनी सर्वाधिक तेजी मिळविण्यात यशस्वी झाली असून आयशर मोटर्स मात्र नुकसानीत राहिली होती. दरम्यान सलग चौथ्या सत्रात शेअरबाजार तेजीत राहिला आहे.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 66 अंकांनी वधारत 73872 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 27 अंकांनी वाढत 22405 अंकांवर बंद झाला होता. शेअर बाजारामध्ये सोमवारी सकाळपासून ते संध्याकाळच्या सत्रामध्ये चढउतार पाहायला मिळाला. बीएसई सेन्सेक्स दिवसाच्या सत्रात कधी घसरणीत तर कधी तेजीत अशा प्रकारे वाटचाल करत होता. त्यामुळे गुंतवणुकदारही काहीसे सावध राहिलेले पहायला मिळाले. निफ्टीने मात्र 22400 चा स्तर राखून बंद होण्यात यश मिळविले आहे. ऑईल आणि गॅस क्षेत्राच्या निर्देशांकाने सोमवारी दमदार कामगिरी नोंदविली. निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा आणि निफ्टी फायनान्शीयल सर्व्हिसेस यांचे निर्देशांक तेजीत दिसून आले. दुसऱ्या बाजुला बीएसई स्मॉल कॅप, निफ्टीतील आयटी, ऑटो आणि एफएमसीजी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले.
शेअर बाजारात विविध समभागांच्या कामगिरीचा विचार केल्यास एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. पोलाद क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा स्टील त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रातील आघाडीवरची बँक एसबीआय यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले होते. बजाज ऑटो, डॉक्टर रे•ाrज लॅब व एचडीएफसी लाईफ यांचे समभाग तेजीत राहिले होते. महिंद्रा आणि महिंद्रा, ब्रिटानिया, अपोलो हॉस्पिटल आणि एलटीआय माईंड ट्रि यांच्या समभागात कमकुवतता दिसून आली. एनटीपीसी, पॉवरग्रीड कॉर्प, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्टस्, टाटा मोटर्स आणि टाटा कंझ्युमर्स यांचे समभाग 52 आठवड्यानंतर उच्चांकी स्तरावर पोहोचले होते.
जागतिक बाजारातील चित्र पाहता अमेरिकेमध्ये मिश्रकल पाहायला मिळाला. डोव्ह जोन्स 86 अंकांनी घसरणीत होता. तर दुसरीकडे नॅसडॅक निर्देशांक 180 अंकांनी वधारत कामगिरी करत होता. युरोपातील बाजारात मिश्रकल पहायला मिळाला. आशियाई बाजारात काहीसा उत्साह दिसून आला. निक्केई 198 अंक, कोस्पी 31 अंक, शांघाई कंपोझिट 12 अंक व हँगसेंग 6 अंकांनी वधारत व्यवहार करीत होते.