सर्व्हरची रखडपट्टी : हेस्कॉमची मलमपट्टी!

सर्व्हरची रखडपट्टी : हेस्कॉमची मलमपट्टी!

सर्व्हर डाऊन समस्येमुळे ग्राहकांत संताप : मुदत उलटूनही परिस्थितीत सुधारणा नाही
बेळगाव : हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. महिना होत आला तरी अद्याप सर्व्हरची समस्या पूर्णत: मिटलेली नाही. यामुळे नवीन वीज कनेक्शनसह इतर सर्व कामे ठप्प आहेत. सर्व्हर सुरू झाला, परंतु तो कासव गतीने असल्याने सर्व कामे रखडल्याने कंत्राटदार तसेच ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे. हेस्कॉमच्या सर्व्हरमध्ये दुरुस्ती करण्यासाठी 10 ते 19 मार्च दरम्यान संपूर्ण राज्यातील सर्व्हर बंद ठेवण्यात आला होता. परंतु, त्यानंतर दहा दिवस उलटले तरी अद्याप ही समस्या दूर झालेली नाही. नवीन कनेक्शन देणे, नावातील बदल, लोड वाढवून घेणेसह व्यावसायिक कनेक्शनच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. बेळगाव शहरासह ग्रामीण भागात  लाखो ग्राहक असून, नवीन कनेक्शन मिळत नसल्याने कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. सर्व्हरची गती अत्यंत कमी असल्याने सर्व कामे रखडली आहेत. सर्व्हर सुरू होत असला तरी पुढील प्रक्रिया होत नसल्याने नवीन कनेक्शन घेण्यात अडचणी येत आहेत. गुढी पाडवा आठवडाभरावर येऊन ठेपल्याने नवीन घरांचा ताबा मिळविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू असताना सर्व्हर डाऊन असल्याने कामे रखडली जात आहेत. महिनाभरापासून सर्व्हर नसल्याने हेस्कॉमच्या अनागोंदी कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.
लवकरच समस्या दूर
सर्व्हर दुरुस्तीसाठी मार्च महिन्यात दहा दिवस सर्व्हर बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर सर्व्हर सुरू झाला, मात्र त्यांची गती अत्यंत धीमी आहे. यामुळे काही प्रमाणात ग्राहकांची गैरसोय होत असून लवकरच ही समस्या दूर होईल.
 -संजीव हम्मण्णावर (साहाय्यक कार्यकारी अभियंता)