साबालेंका, कॉलिन्स उपांत्य फेरीत

साबालेंका, कॉलिन्स उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था /रोम
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिला एकेरीमध्ये आर्यना साबालेंका आणि अमेरिकेची डॅनिली कॉलिन्स यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. महिला एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लॅटवियाच्या साबालेंकाने ओस्टापेंकोचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. हा सामना 80 मिनिटे चालला होता. साबालेंकाने आतापर्यंत ओस्टापेंकोबरोबर सर्व म्हणजे तीन सामने जिंकले आहेत. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या 15 व्या मानांकित डॅनिली कॉलिन्सने बेलारुसच्या माजी टॉप सिडेड अझारेंकाचा 6-4, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. आता साबालेंका व कॉलिन्स यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. पुरुषांच्या विभागात चिलीच्या अॅलेजेंड्रो तेबिलोने झेंग झीझेनचा 6-3, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.