‘स्मार्ट’ कामांची पावती पावसाळ्यानंतरच मिळेल!

दर्जाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही : मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडून कामांची पाहणी पणजी : स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत सुरू असलेली कामे आतापर्यंत 90 टक्के पूर्ण झालेली असून उर्वरित कामे पावसाळ्यानंतरच हाती घेणे शक्य होणार आहे, अशी माहिती पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली आहे. काल गुऊवारी स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी संजित रॉड्रिग्ज आणि अन्य अधिकाऱ्यांसह […]

‘स्मार्ट’ कामांची पावती पावसाळ्यानंतरच मिळेल!

दर्जाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही : मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडून कामांची पाहणी
पणजी : स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत सुरू असलेली कामे आतापर्यंत 90 टक्के पूर्ण झालेली असून उर्वरित कामे पावसाळ्यानंतरच हाती घेणे शक्य होणार आहे, अशी माहिती पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली आहे. काल गुऊवारी स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी संजित रॉड्रिग्ज आणि अन्य अधिकाऱ्यांसह काही कामांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्र्यांनी पाहणी केलेल्या कामांमध्ये खास करून मळा ते काकुलो जंक्शन या भागांचा समावेश होता.
31 मे ची डेडलाईन हुकली
स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत सुरू असलेली सर्व कामे 31 मे पर्यंत पूर्ण होतील, असे आश्वासन सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून दिले होते. त्यानुसार ही कामे आज 31 पर्यंत पूर्ण होणे क्रमप्राप्त होते. परंतु आतापर्यंत 90 टक्केच कामे पूर्ण झाली असून उर्वरित अद्याप पूर्ण होणे बाकी आहेत. त्या पार्श्वभूमिवर काल दि. 30 मे रोजी मोन्सेरात यांनी या कामांची पाहणी केली. अपूर्ण राहिलेल्या कामांमध्ये खास करून मॅनहोल, पदपथ आणि रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण आदी कामांचा समावेश आहे.
18 जून रस्ता पावसाळ्यानंतरच
आतापर्यंत 90 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्यात 18 जून रस्त्याचा समावेश नाही. पावसाळ्यात सर्वाधिक पाणी साचून पूरसदृष्य स्थिती निर्माण करणारा हाच मुख्य भाग आहे. या रस्त्याला अद्याप हातही लावलेला नाही. त्यामुळे यंदाही या भागात पाणी तुंबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कुंडईकर नगर भागात स्टॉर्म ड्रेन वाहिनी घालण्याचेही काम शिल्लक आहे. या वाहिनीसाठी पावसाळ्यानंतर निविदा काढण्यात येणार आहेत. बाकी महत्त्वाची कामे पूर्ण झाली असून मॅनहोल, पदपथ बांधण्याचे काम येत्या काही दिवसात पूर्ण होईल. दरम्यान, सध्यातरी कामांचा दर्जा समाधानकारक वाटत असला तरी निविदेच्या अटीनुसार पावसाळ्यात काही कामांच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाल्यास ती कामे कंत्रादारांकडून पुन्हा करवून घेण्यात येतील, असे मोन्सेरात यांनी सांगितले.