बांगलादेशच्या पंतप्रधान भारत दौऱ्यावर

पंधरवड्यात दुसरी भेट : तिस्ता पाणी वाटपासह चर्चा अपेक्षित ► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, ढाका बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शुक्रवारी सायंकाळी भारत दौऱ्यावर दाखल झाल्या. पंतप्रधान मोदींसोबत शनिवारी होणाऱ्या शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांच्या सर्व प्रमुख मुद्यांवर चर्चा होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी त्यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांची भेट घेत द्विपक्षीय बोलणी केली. तसेच बांग्लादेशच्या […]

बांगलादेशच्या पंतप्रधान भारत दौऱ्यावर

पंधरवड्यात दुसरी भेट : तिस्ता पाणी वाटपासह चर्चा अपेक्षित
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, ढाका
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शुक्रवारी सायंकाळी भारत दौऱ्यावर दाखल झाल्या. पंतप्रधान मोदींसोबत शनिवारी होणाऱ्या शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांच्या सर्व प्रमुख मुद्यांवर चर्चा होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी त्यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांची भेट घेत द्विपक्षीय बोलणी केली. तसेच बांग्लादेशच्या बाजूने तीस्ता पाणी वाटप करार, सीमापार कनेक्टिव्हिटी, म्यानमारमधील सुरक्षा परिस्थिती तसेच आर्थिक आणि व्यापारविषयक मुद्दे अजेंड्यात शीर्षस्थानी असणार आहेत.
बांगलादेशच्या पंतप्रधानांची या महिन्यातील ही दुसरी भारत भेट आहे. याआधी 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्या नवी दिल्लीत आल्या होत्या. परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह यांनी दिल्ली विमानतळावर त्यांचे स्वागत केले. आता आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात हसीना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत. या सर्व चर्चा शनिवारी होणार आहेत.
शेख हसीना आणि नरेंद्र मोदी यांची भेट शनिवारी सकाळी होणार आहे. यानंतर शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा होईल. शेख हसीना यांच्या या दौऱ्यात ढाका आणि दिल्लीदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार कराराबाबतही चर्चा होण्याची शक्मयता आहे. गेल्या काही वर्षांत अनेक सीमापार प्रकल्प सुरू करण्यात आले असून त्यांचा रितसर आढावा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी सकाळी राष्ट्रपती भवनात शेख हसीना यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट सज्ज ठेवण्यात आले आहे. या दरम्यान दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजवले जाईल. शेख हसीना यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान हसीना दुपारी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेऊन बांगलादेशला परतणार आहेत.
पुढील महिन्यात चीनला जाणार
भारत दौरा यशस्वी केल्यानंतर शेख हसीना पुढील महिन्यात बीजिंगला भेट देणार आहेत. हसीना यांच्या चीन दौऱ्याच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत, मात्र पंतप्रधानांचा हा दौरा द्विपक्षीय संबंधांसाठी ‘गेम चेंजर’ ठरेल असे ढाक्मयातील चीनचे राजदूत याओ वेन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. चीन सध्या बांगलादेशचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. बांगलादेशने चीनची महत्त्वाकांक्षी योजना बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हवर स्वाक्षरी केली आहे.