पॅट कमिन्सची हॅट्ट्रिक, कांगांरुचा बांगलादेशवर ‘सुपर’ विजय

पॅट कमिन्सची हॅट्ट्रिक, कांगांरुचा बांगलादेशवर ‘सुपर’ विजय

वृत्तसंस्था/ अँटिग्वा
आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस नियमांनुसार सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 28 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला 140 धावांवर रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या डावात अनेक वेळा पावसाने व्यत्यय आणला. ऑसी संघाने 11.2 षटकांत 100 धावा केल्या होत्या  त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. डकवर्थ लुईस नियमानूसार ऑस्ट्रेलिया बांगलादेशच्या 28 धावांनी पुढे होती. यामुळे डकवर्थ लुईस पध्दतीने ऑस्ट्रेलियाने हा सामना आपल्या नावे केला. दरम्यान, ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स टी 20 विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
पावसामुळे सामना उशिरा सुरु झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाचा निर्णय योग्य ठरला. सलामीवीर तंजीद हसनला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर लिटन दास व कर्णधार नजमुल हुसेन शांतो यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. लिटन दासने 16 धावा केल्या तर शांतोने 41 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर तौहीद ह्य्दोयने 28 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारासह 40 धावा फटकावल्या. त्याला इतर फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. ठराविक अंतराने गडी बाद होत गेल्याने बांगलादेशला 8 बाद 140 धावापर्यंत मजल मारता आली. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने हॅट्ट्रिक घेऊन इतिहास रचला. तर फिरकीपटू झम्पाने 2 विकेट्स मिळवल्या.
सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी
धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीने 6.5 षटकात 65 धावांची आक्रमक भागादारी करत सामना आपल्या पारड्यात झुकवला. ट्रेव्हिस हेडने 21 चेंडूत 31 धावा फटकावल्या. आक्रमक खेळणाऱ्या हेडला रिशाद हुसेनने बाद केले. कर्णधार मिचेल मार्शही स्वस्तात बाद झाला. वॉर्नरने मात्र नेहमीच्या स्टाईलने फटकेबाजी करताना 35 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारासह नाबाद 53 धावा केल्या. दरम्यान, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 11.2 षटकांत 2 बाद 100 धावा असताना पावसामुळे दुसऱ्यांदा खेळ थांबवण्यात आला. यावेळी डकवर्थ लुईस पद्धतीनुसार ऑस्ट्रेलियन संघ 28 धावांनी पुढे होता. पाऊस न थांबल्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार पंचांनी ऑस्ट्रेलियाला विजयी केले. बांगलादेशकडून रिशाद हुसेनने दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश 20 षटकांत 8 बाद 140 (लिटन दास 16, नजमुल हुसेन शांतो 41, ह्य्दोय 40, तस्कीन अहमद 13, पॅट कमिन्स 3 तर अॅडम झम्पा 2 बळी, मिचेल स्टार्क, स्टोनिस व मॅक्सवेल प्रत्येकी एक बळी).
ऑस्ट्रेलिया 11.2 षटकांत 2 बाद 100 (डेव्हिड वॉर्नर नाबाद 53, ट्रेव्हिस हेड 31, मॅक्सवेल नाबाद 14, रिशाद हुसेन 2 बळी).
यंदाच्या वर्ल्डकपमधील पहिली हॅट्ट्रिक
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध सुपर 8 मधील सामन्यात पॅट कमिन्सने ही कामगिरी केली. कमिन्सने मेहमुदुल्लाह, मेंहदी हसन आणि तौहीद ह्य्दोयला बाद केले. कमिन्सने बांगलादेशच्या डावातील 18 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मेहमुदुल्लाहला बाद करून पहिले यश मिळवले. पुढच्याच चेंडूवर मेंहदी हसनला झंपाने झेलबाद केले आणि सलग दुसरी विकेट मिळवली. 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कमिन्सने तौहीद हृदयला हेझलवूडकरवी झेलबाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. यासह तो यंदाच्या वर्ल्डकपमध्ये हॅट्ट्रिक नोंदवणारा पहिला तर टी 20 वर्ल्डकपमध्ये हॅट्ट्रिक करणारा तो जगातील सातवा गोलंदाज ठरला.
टी 20 वर्ल्डकपमध्ये हॅट्ट्रिक करणारे गोलंदाज
ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) वि बांगलादेश, 2007
कर्टिस कॅम्फर (आयर्लंड) वि नेदरलँड्स, 2021
वानिंदू हसरंगा (श्रीलंका) वि द. आफ्रिका, 2021
कागिसो रबाडा (द आफ्रिका) वि इंग्लंड, 2021
कार्तिक मयप्पन (यूएई) वि श्रीलंका, 2022
जोशुआ लिटल (आयर्लंड) वि न्यूझीलंड, 2022
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) वि बांग्लादेश, 2024.
 
 गटात ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी, टीम इंडियाची घसरण
ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा 28 धावांनी पराभव केला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने ग्रुप-1 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तर भारत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे समान 2-2 गुण असले तरी कांगारूंचा नेट रनरेट चांगला आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट 2.471 आहे. तर भारतीय संघाचा नेट रनरेट 2.350 आहे.