निवडणूक आयोगाकडून आता विधानसभा निवडणुकांची तयारी

निवडणूक आयोगाकडून आता विधानसभा निवडणुकांची तयारी

जम्मू काश्मीरसह चार राज्यात यावषी विधानसभेसाठी मतदान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाने विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे. यावषी देशातील चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा यांचा प्रामुख्याने समावेश असून  जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणूक घेण्याची तयारी आयोगाने सुरू केली आहे. त्यानुसार मतदारयादी अद्ययावत करण्याचे आदेश राज्यांना जारी केले आहेत. हे काम 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण करायचे आहे. मतदारांचा डेटा अपडेट केल्यानंतर निवडणूक आयोग चार राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकतो.
लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीत निवडणूक आयोग व्यग्र असून सर्वप्रथम मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू आहे. निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर, हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रात मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार 1 जुलै रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले तरुण-तरुणी आपल नाव नोंदवून ‘मतदार’ बनू शकतात. या प्रक्रियेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. याप्रसंगी मृत मतदारांची नावे यादीतून वगळण्याची प्रक्रियाही पार पाडली जाईल. त्यानंतर मतदारयादी अद्ययावत करण्यात येणार आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर 2024 रोजी, झारखंडचा 26 नोव्हेंबर आणि महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका वेळेवर घ्याव्या लागतील. यासाठी सर्वप्रथम मतदार यादी अद्ययावत करणे आवश्यक आहे.
काश्मीरमध्येही मतोत्सव
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये यावषी सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आले होते. तसेच राज्य जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले. याआधी 2014 मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती. 2018 मध्ये भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे युतीचे सरकार पडल्यानंतर भाजपने पीडीपीसोबतची युती तोडली. सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर 2023 मध्ये निवडणूक आयोगाला जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबर 2024 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही एका मुलाखतीत जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपूर्वी विधानसभा निवडणुका होणार असल्याचे सांगितले होते. तसेच आता काश्मीर दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनीही येथे लवकरच विधानसभांसाठी मतदान होईल, असे म्हटले आहे.
महाराष्ट्रात 2019 मध्ये विधानसभेच्या 288 जागांवर निवडणुका झाल्या होत्या. यात 106 आमदारांसह भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना आणि भाजपची बोलणी फिस्कटल्यानंतर शिवसेनेने आपल्या 56 आमदारांसह काँग्रेसच्या 44 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारांच्या पाठबळावर महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मे 2022 मध्ये महाराष्ट्र सरकारमधील नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह बंड करत भाजपच्या साथीने 30 जून 2022 रोजी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
हरियाणामध्ये 2019 मध्ये शेवटच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला 41 तर जेजेपीला 10 जागा मिळाल्या. भाजपने 6 अपक्ष आणि एक हलोपा आमदारांसह सरकार स्थापन केले. मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री करण्यात आले. मात्र, त्यांना त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. यावषी 12 मार्च रोजी जेजेपी आणि भाजपची युती तुटली. सैनी यांची विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मनोहरलाल खट्टर यांच्या जागी नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री नायब सैनी यांनी आपल्याला 48 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. या बैठकीला भाजपचे 41 आणि 7 अपक्ष आमदार उपस्थित होते. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 46 आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता.