स्मार्ट सिटी कामांच्या विलंबास गत सल्लागार जबाबदार

स्मार्ट सिटी कामांच्या विलंबास गत सल्लागार जबाबदार प्रतिनिधी~ पणजी राजधानीतील स्मार्ट सिटीच्या कामांचे नियोजन बिघडण्यास आणि बरीच कामे आजही अपूर्णावस्थेत राहण्यास यापूर्वीचे सल्लागार जबाबदार आहेत, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. त्याही परिस्थितीत ही कामे शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न चालू आहेत, असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर या कामांमुळे लोकांना झालेल्या त्रासांबद्दल त्यांनी […]

स्मार्ट सिटी कामांच्या विलंबास गत सल्लागार जबाबदार

स्मार्ट सिटी कामांच्या विलंबास गत सल्लागार जबाबदार
प्रतिनिधी~ पणजी
राजधानीतील स्मार्ट सिटीच्या कामांचे नियोजन बिघडण्यास आणि बरीच कामे आजही अपूर्णावस्थेत राहण्यास यापूर्वीचे सल्लागार जबाबदार आहेत, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. त्याही परिस्थितीत ही कामे शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न चालू आहेत, असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर या कामांमुळे लोकांना झालेल्या त्रासांबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.
शनिवारी पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मंत्री बाबुश मोन्सेरात, स्मार्ट सिटीचे सीईओ संजित रॉड्रिग्ज, महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या सोबत मुख्यमंत्र्यांनी पूर्ण झालेल्या तसेच सध्या चालू असलेल्या कामांची पाहणी केली.
आतापर्यंत 90 टक्के कामे पूर्ण : मुख्यमंत्री
खरे तर आतापर्यंत स्मार्ट सिटीची कामे 100 टक्के पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु या कामांची देखरेख करणाऱ्या पूर्वीच्या काही सल्लागारांनी या कामांचे नियोजन बिघडवून टाकले. परिणामी बरीच कामे पूर्ण होण्यास विलंब झाला. सध्या 90 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेदेखील लवकरच पूर्ण होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी कामांच्या दर्जाबाबत विचारण्यात आले असता, दर्जा समाधानकारक असल्याचे ते म्हणाले. तरीही काही त्रुटी आढळून आल्याच तर त्या संबंधित कंत्रादारांकडूनच दुऊस्त करून घेण्यात येतील. त्यासाठीचा खर्च सदर कंत्राटदार पदरमोड करून करेल. सरकार कोणतेही अतिरिक्त पैसे देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शहरातील पाण्याचा मांडवी नदीत निचरा करणाऱ्या व्यवस्थेचीही पाहणी केली. भरतीच्यावेळी पाऊस झाल्यास तुंबलेले पाणी व्यवस्थित बाहेर जाण्यासाठीही विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार कमी होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
जोडणी न घेणाऱ्यांचे तोडणार पाणी
दरम्यान, स्मार्ट सिटीअंतर्गत नवीन सांडपाणी वाहिनी घालण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांनी जोडणी घेणे आवश्यक आहे. अनेक नागरिकांनी अद्याप सांडपाणी जोडणी घेतलेली नाही. अशा घरांची पाणी आणि वीज जोडणी तोडण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.