संभाव्य आपत्ती निवारणासाठी रेल्वे खात्याकडून पूर्वतयारी

संभाव्य आपत्ती निवारणासाठी रेल्वे खात्याकडून पूर्वतयारी

घाटातील रेल्वेमार्गाच्या पाहणीसह डागडुजी
बेळगाव : पावसाळ्याच्या दिवसात रेल्वेमार्गावर दरड कोसळणे, रेल्वेरूळाखालील माती व खडी वाहून जाणे असे प्रकार होऊ नयेत, यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नैर्त्रुत्य रेल्वेने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. कॅसलरॉक ते कुळे या घाटमाथ्यावरील रेल्वेमार्गाची दुरुस्ती करण्यात येत आहे. प्रतिवर्षी रेल्वे विभागाकडून मान्सूनपूर्व दुरुस्तीचे काम केले जाते. विशेषत: घाट परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, अतिरिक्त पाण्यामुळे रेल्वेरूळाखालील माती व खडी वाहून जाणे, रेल्वेरूळाखाली पाणी साचणे असे प्रकार होत असतात. मागील दोन वर्षांत बेळगाव वास्को रेल्वेमार्गावरील दूधसागरनजीक दरड कोसळल्याने रेल्वेवाहतुकीवर परिणाम झाला होता. असे प्रकार घडू नयेत, यासाठी ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे, तेथे प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत.
कॅसलरॉक-कुळे-तिनईघाट या ठिकाणी रेल्वेमार्गाची तपासणी करण्यात आली आहे. रेल्वेचे रूळ त्याचबरोबर खडी, काँक्रिटच्या प्लेट यांची तपासणी करण्यात आली. तसेच 90 वाघिणी खडी रेल्वेमार्गानजीक एकत्रित करून ठेवण्यात आली आहे. दरड कोसळल्यास खडी घालून रेल्वेमार्ग पुन्हा खुला करण्यासाठी पूर्वतयारी करून ठेवण्यात आली आहे. याबरोबरच ट्रॅकमन व इतर रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.