वास्तव महापालिका शाळांचे : भाग 1 ‘वीर कक्कया’ शाळेचे विद्यार्थी बनले संशोधक, जिल्हाधिकारी, पोलीस
मनपा वीर कक्कया विद्यालय क्रमांक 17, जवाहरनगर; स्वातंत्र्य काळापासून शिक्षणाचे धडे देणारी शाळा : शाळेचे अमृतमहोत्सवी वर्ष पुर्ण : प्रत्येक वर्गात एलईडी स्क्रिन : सीसीटीव्हीचा वॉच : स्पर्धा परीक्षांचे विशेष मार्गदर्शन
इम्रान गवंडी कोल्हापूर
जवाहरनगर येथील गोर-गरीब, सर्वसामान्य व कष्टकऱ्यांच्या मुलाबाळांना मोफत शिक्षणाची सोय व्हावी, या उद्देशाने स्वांतत्र्य काळात म्हणजेच 1947 साली शाळेची स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्य काळापासून शिक्षणाचे धडे देणारी शाळा म्हणून शाळेचे नावलौकिक झाले आहे. सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्याचे काम शाळेने स्वातंत्र्य काळापासून केले आहे.
या शाळेतून शिकून गेलेली मुले संशोधक, जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक, जीएसटी अधिकारी अशा विविध शासकीय सेवेत कार्यरत आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशचे जिल्हाधिकारी म्हणून सौरभ व्हटकर, डॉ. होमी भाभा रिसर्च सेंटर येथे शुभम कदम सेवा बजावत आहेत. सध्या कोल्हापूर विभागात जीएसटी विभागात अधिकारी पदावर रूजू असणारे करणसिंह कदम व माजी सहायक पोलीस निरीक्षक येशवंत व्हटकर यांचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत शिक्षण याच शाळेत झाले आहे. महोत्सवी वर्षात झालेले पदार्पन हे एक शाळेचे खास वैशिष्ठ्य आहे.
मनपा वीर कक्कया विद्यालय क्र.17 शाळेची स्थापना 1947 साली झाली. सध्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे सर्व वर्ग सेमी इंग्रजी व मराठी माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. इयत्ता पहिली ते सातवी वर्गाच्या दोन्ही माध्यमसाठी प्रत्येकी दोन तुकड्या आहेत. बालवाडीचे लहान व मोठा गट असे दोन वर्ग भरतात. सध्या शाळेत पाचशेच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेला भव्य असे पटांगण असून प्रशस्त अशी दुमजली इमारत आहे. शाळेचा परिसर हा हिरव्यागार वृक्षांनी नटलेला निसर्गरम्य वातावरणाचा आहे.
प्रत्येक वर्गातील शिक्षण झाले स्मार्ट
शाळेत सेमी इंग्रजी व मराठी माध्यमसाठी 19 वर्ग खोल्या आहेत. प्रत्येक वर्गात स्मार्ट एलईडी स्क्रिन बसवली आहे. काळानूरूप शाळेचे शिक्षण स्मार्ट झाले आहे. कॉम्प्युटर शिक्षणासाठी दोन स्वतंत्र कक्ष निर्माण केले आहेत.
24 तास खुले असणारे ‘मुक्त वाचनालय’
शाळेचा ‘मुक्त वाचनालय’ हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत शाळेच्या व्हरांड्यात 24 तास खुले असणारे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांबरोबरच भागातील नागरिकांनाही याचा फायदा होत आहे.
पारस बागेच्या निर्मितीतून शेतीचे धडे
शाळेच्या एका बाजूस 25 हजार रूपये खर्चून विद्यार्थी व शिक्षकांनी पारस बागेची निर्मिती केली आहे. यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनीही हातभार लावला आहे. बागेत विविध भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. यातून विद्यार्थ्यांना शेतीचे धडे मिळत आहेत. उत्पादीत केलेल्या भाज्यांचा मुलांच्या पोषण आहारात समावेश केला जातो. यामध्ये वांगी, कोबी, शेवगा, मिरची, कांदापात, कडीपत्ता, केळी आदींची लागवड केली जाते.”
स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन
शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विविध स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन केले जाते. यातून अनेक विद्यार्थी गुणवंत ठरलेले आहेत. राजस्तरीय स्पर्धा परीक्षामध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगीरी केली आहे.
मुलींना स्वसंरक्षणाचे धडे
शिक्षणाबरोबरच मुलांना लाठीकाठी, मर्दानी खेळांसह सेल्फ डिफेन्सचे शिक्षण दिले जाते. विज्ञान प्रदर्शन, शहरस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, बालनाट्या स्पर्धा, शहरस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेचा नेहमीच दबदबा राहिला आहे. पर्यावरण संरक्षण व आरोग्याच्या दृष्टीने चॉकलेटमुक्त शाळा हा उपक्रम राबवला जात आहे.
सुसज्य प्रयोगशाळा व सीसीटीव्हीचा वॉच
17 लाख रूपये खर्चून अद्यावत व अधुनिक प्रयोगशाळा उभारली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, 24 तास सीसीटीव्हीच्या माध्यातून लक्ष ठेवले जाते. दर्जेदार शिक्षणामुळेच शाळा 75 वर्षाहून अधिक काळापासून टिकून आहे. शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी मोठ्या हुद्यावर सेवा बजावत आहेत.
भारती सुर्यवंशी, मुख्याध्यापिक, मनपा वीर कक्कया विद्यालय.