वानखेडेवर आज पुनरागमनाचे मुंबईचे लक्ष्य, राजस्थानशी मुकाबला

वृत्तसंस्था/ मुंबई मुंबई इंडियन्सची आयपीएलमधील सुरुवात ही नेहमीच चांगली राहिलेली नाही. नवीन कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ आज सोमवारी येथील वानखेडे स्टेडियमवर आत्मविश्वास वाढलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना करताना घरच्या मैदानावरून स्पर्धेत जोरदार पुनरागमन करण्याची आशा बाळगून असेल. मुंबई इंडियन्सला त्यांच्या पहिल्या दोन सामन्यांत पराभव पत्करावे लागून पुन्हा एकदा त्यांच्या आयपीएल मोहिमेची सुरुवात निराशाजनक राहिली […]

वानखेडेवर आज पुनरागमनाचे मुंबईचे लक्ष्य, राजस्थानशी मुकाबला

वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई इंडियन्सची आयपीएलमधील सुरुवात ही नेहमीच चांगली राहिलेली नाही. नवीन कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ आज सोमवारी येथील वानखेडे स्टेडियमवर आत्मविश्वास वाढलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना करताना घरच्या मैदानावरून स्पर्धेत जोरदार पुनरागमन करण्याची आशा बाळगून असेल.
मुंबई इंडियन्सला त्यांच्या पहिल्या दोन सामन्यांत पराभव पत्करावे लागून पुन्हा एकदा त्यांच्या आयपीएल मोहिमेची सुरुवात निराशाजनक राहिली आहे. पंड्याला त्याचा पूर्वाश्रमीचा संघ गुजरात टायटन्सकडून सहा धावांनी पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर सनरायझर्स हैदराबादने हैदराबादमध्ये विक्रमी धावसंख्या उभारताना लढत 32 धावांनी जिंकली. मुंबई इंडियन्स यामुळे 10 संघांच्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर घसरला आहे.
 
स्पर्धेचे हे अद्याप सुरुवातीचे दिवस असले, तरी पंड्याच्या मुंबई इंडियन्ससाठी शक्य तितक्या लवकर त्यांचा पराभवाचा सिलसिला संपवणे आणि धावसरासरी सुधारणे आवश्यक आहे. सर्व संघांमध्ये सर्वांत खराब म्हणजे उणे 0.925 अशी त्यांची धावसरासरी आहे. दोन वेगवेगळ्या दुखापतींमधून सावरणाऱ्या सूर्यकुमार यादवची अनुपस्थिती ही त्यांच्यासमोर समस्या उभी करून गेली आहे. राजस्थान रॉयल्ससोबतच्या मागील पाच सामन्यांचा विचार करता मुंबई इंडियन्सचे पारडे 4-1 असे भारी असले, तरी संजू सॅमसनच्या संघाने दोन विजय नोंदवत धडाक्यात सुरुवात केलेली असल्यामुळे मुंबईला त्यांचे आव्हान सोपे जाणार नाही.
रोहितने मुंबईला दमदार सुऊवात करून दिलेली असली, तरी त्याच्याकडून मोठ्या डावाची गरज आहे. पण त्यापेक्षा जास्त गरज पंड्याने योग्य निर्णय घेण्याची आहे. त्याने जसप्रीत बुमराहला योग्य प्रकारे वापरलेले नाही. बुमराह आणि पियुष चावला यांच्यामुळे त्यांच्या आक्रमणाला अनुभवाची जोड मिळाली आहे. स्थानिक खेळाडू शम्स मुलानीवरही त्यांनी विश्वास दाखवला आहे. दक्षिण आफ्रिकेचा 17 वर्षीय खेळाडू क्वेना मफाका सनरायझर्सविरुद्ध भरपूर महागडा ठरलेला असला, तरी या अनुभवातून तो बरेच काही शिकू शकेल.
दुसऱ्या बाजूने राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन आयपीएलच्या सुऊवातीच्या टप्प्यात नेहमीच धोकादायक राहिला आहे, तर घरच्या मैदानावर खेळणार असलेला यशस्वी जैस्वाल या मोसमातील पहिली मोठी धावसंख्या उभारण्यास उत्सुक आहे.  रियान पराग हा मधल्या फळीतील परिपक्व फलंदाज म्हणून आपली भूमिका पार पाडेल. मुंबईतर्फे तिलक वर्मा, टीम डेव्हिड आणि नमन धीर हे चांगल्या सुऊवातीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे लक्ष्य समोर ठेवतील.
राजस्थान रॉयल्सकडे लांबलचक फलंदाजीची फळी असून त्यात धोकादायक जॉस बटलर आणि ध्रुव जुरेलही आहे. गोलंदाजीत नांद्रे बर्गरने ट्रेंट बोल्टसोबत चांगली जोडी जमवली आहे, तर रविचंद्रन अश्विन आणि यजुवेंद्र चहल ही फिरकी जोडी मधल्या षटकांत धावांचा प्रवाह अडवू शकते. अंतिम षटकांत संदीप शर्मासह आवेश खानचे राहिलेले नियंत्रण हे रॉयल्सचे बलस्थान म्हणता येईल.
संघ : मुंबई इंडियन्स-हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, टीम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वढेरा, ल्यूक वूड, सूर्यकुमार यादव.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), आबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फेरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल सिंह राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिमरोन हेटमायर, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, टॉम कोहलर-कॅडमोर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, यजुवेंद्र चहल, तनुष कोटियन.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.