दिल्लीचा चेन्नईला पहिला ‘दे धक्का’

दिल्लीचा चेन्नईला पहिला ‘दे धक्का’

दिल्ली कॅपिटल्सचा 20 धावांनी पहिला विजय, सामनावीर खलील अहमदचे 2, मुकेश कुमारचे 3 बळी
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील येथे रविवारी खेळविण्यात आलेल्या 13 व्या सामन्यात पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने विद्यमान विजेत्या चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा पहिला धक्का दिला. दिल्लीने चेन्नईला विजयासाठी 192 धावांचे आव्हान दिले. पण चेन्नईने 6 बाद 171 धावापर्यंत मजल मारल्याने दिल्लीने हा सामना 20 धावांनी जिंकून स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदविला. दिल्ली संघातील वॉर्नर, कर्णधार पंत यांची अर्धशतके तसेच मुकेश कुमार आणि खलील अहमद यांची भेदक गोलंदाजी वैशिष्ट्यो ठरली.
चेन्नईच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कर्णधार ऋतुराज गायकवाड खलील अहमदच्या गोलंदाजीवर पंतकरवी झेलबाद झाला. त्यांने केवळ 1 धावा जमविली. खलील अहमदने आपल्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या रचिन रवींद्रला दोन धावावर झेलबाद केले. चेन्नई संघावर यावेळी चांगले दडपण आले होते. अजिंक्य रहाणे आणि मिचेल यानी संघाचा डाव सावरताना 3 गड्यासाठी 68 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने स्वत:च्या गोलंदाजीवर मिचेलला टिपले. त्याने 26 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 34 धावा जमविल्या. दिल्लीचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने आपल्या पहिल्या षटकातील सलग दोन चेंडूवर अजिंक्य रहाणे आणि समीर रिजवी यांना बाद केल्याने चेन्नईवर पराभवाचे सावट निर्माण झाले.
एका षटकात चेन्नईचे हे दोन गडी बाद झाल्याने सामन्याला कलाटणी मिळाली. रहाणेने 30 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह 45 तर रिजवीला खाते उघडता आले नाही. चेन्नईचा निम्मा संघ 102 धावात तंबूत परतला होता. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांच्यावर चेन्नईची भिस्त होती. पण मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर दुबे उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्यांने 17 चेंडूत 1 चौकारासह 18 धावा जमविल्या. रवींद्र जडेजा आणि धोनी यानी विजय मिळविण्यासाठी प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळाले नाही, त्यांनी धावगती फार खाली उतरणार नाही, याची दक्षता घेतली. जडेजाने 17 चेंडूत 2 चौकारासह  नाबाद 21, तर धोनीने 16 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 37 धावा फटकाविल्या. या जोडीने 23 चेंडूत अभेद्य 51 धावांची भागीदारी केली. चेन्नईच्या डावात 13 अवांतर धावा मिळाल्या. दिल्लीतर्फे मुकेश कुमारने 21 धावात 3 तर खलील अहमदने 21 धावात 2, तसेच अक्षर पटेलने 20 धावात 1 गडी बाद केला. चेन्नईने पॉवरप्लेच्या 6 षटकात 32 धावा जमविताना 2 गडी गमिवले. चेन्नईचे अर्धशतक 51 चेंडूत, शतक 77 चेंडूत तर दीडशतक 112 चेंडूत फलकावर लागले. चेन्नईच्या डावात 7 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले.
वॉर्नर-शॉ यांची फटकेबाजी
तत्पूर्वी, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार पंत आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 बाद 191 धावा जमविल्या.
या सामन्यात वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी सलामीच्या गड्यासाठी 57 चेंडूत 93 धावांची भागीदारी केली. मुस्तफिजुर रेहमानने वॉर्नरला झेलबाद केले. त्याने 35 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारासह 52 धावा झळकविल्या. वॉर्नर बाद झाल्यानंतर दिल्लीने दुसरा गडी पाठोपाठ गमविला. रवींद्र जडेजाने शॉला धोनीकरवी  झेलबाद केले. शॉने 27 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह 43 धावा जमविल्या. पंतने खेळपट्टीवर शेवटपर्यंत राहून संघाला बऱ्यापैकी धावसंख्या उभी करून दिली. पंतने 32 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारासह 51 धावा जमविल्या. पुनरागमनानंतर या स्पर्धेतील पंतचे हे पहिले अर्धशतक आहे. मिचेल मार्शने 12 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 18 धावा जमविताना पंतसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 31 धावांची भर घातली. पथीरानाने मार्शचा त्रिफळा उडविला. यानंतर पथीरानाने आपल्या याच षटकातील शेवटच्या चेंडूवर स्टब्जला खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळाचित केले. अक्षर पटेलने 8 चेंडूत नाबाद 7, तर पोरेलने 6 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 9 धावा जमविल्या. पंत 19 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर झेलबाद झाला. दिल्लीला अवांतराच्या रूपात 11 धावा मिळाल्या. दिल्लीच्या डावात 9 षटकार आणि 16 चौकार नेंदविले गेले.
दिल्लीने पॉवरप्लेच्या 6 षटकात 62 धावा जमविल्या. दिल्लीचे अर्धशतक 33 चेंडूत, शतक 64 चेंडूत तर दीडशतक 105 चेंडूत फलकावर लागले. वॉर्नरने आपले अर्धशतक 32 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीने तर पंतने आपले अर्धशतक 31 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने नोंदविले. चेन्नईतर्फे पथीरानाने 31 धावात 3, तर मुस्तफिजुर रेहमान आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 5 बाद 191 (पृथ्वी शॉ 43, वॉर्नर 52, पंत 51, मार्श 18, पटेल नाबाद 7, पोरेल नाबाद 9, अवांतर 11, पथीराना 3-31, जडेजा 1-43, मुस्तफिजुर रेहमान 1-47).
चेन्नई सुपर किंग्ज 20 षटकात 6 बाद 171 (रहाणे 45, मिचेल 34, दुबे 18, जडेजा नाबाद 21, धोनी नाबाद 37, अवांतर 13, मुकेश कुमार 3-21, खलील अहमद 2-21, अक्षर पटेल 1-20).