भारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत

भारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत

जीडीपी दर 6.8 टक्के राहण्याचा अंदाज : अर्थव्यवस्थेत झाली सुधारणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक रेटिंग एजन्सी मुडीज् यांनी भारताचा विकासदर चांगला राहणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत. या आधीच्या दिलेल्या अंदाजामध्ये मुडीज्ने काहीशी सुधारणा करत नवा अंदाज मांडला आहे.
मुडीज् या संस्थेच्या अंदाजानुसार 2024 कॅलेंडर वर्षाकरिता भारताचा जीडीपी 6.8 टक्के इतका राहू शकतो, असे म्हटले आहे. या आधी संस्थेने हा अंदाज 6.1 टक्के इतका वर्तविला होता. अलीकडेच भारताने डिसेंबर तिमाहीतला आपला जीडीपी दर 8.4 टक्के असल्याचे म्हटले होते. या अंदाजानुसार व एकंदर भारतातील वाढलेल्या उत्पादन प्रक्रियेकडे पाहता मुडीज्ने सुधारित अंदाज व्यक्त केला आहे.
2025 साठी काय असेल चित्र
डिसेंबर तिमाहीतील आकडेवारीनंतर बार्कलेज यांनी 2023-24 साठी 7.8 टक्के इतका विकासदर अनुमानित केला आहे. तर मुडीज्ने 2025 साठी भारताचा जीडीपी दर 6.4 टक्के इतका राहिल, असे म्हटले आहे. भारताची अर्थव्यवस्था सध्या वेगवानपणे कार्यरत असून 2023 पेक्षाही चांगली कामगिरी अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये भारताची दिसून आली आहे. 2024 मध्ये 6.1टक्क्यांहून 6.8 टक्क्यांवर जीडीपी दर जाऊ शकतो, असेही मुडीज्ला म्हणायचे आहे.