लंकेचा पहिल्या डावात 531 धावांचा डोंगर

लंकेचा पहिल्या डावात 531 धावांचा डोंगर

वृत्तसंस्था/ चेतोग्राम
येथे सुरु असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी लंकेने पहिल्या डावात 531 धावांचा डोंगर रचल्यानंतर यजमान बांगलादेशने पहिल्या डावात 1 बाद 55 धावा जमविल्या होत्या. लंकेच्या पहिल्या डावात 6 फलंदाजांनी अर्धशतके झळकाविली.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत लंकेने यापूर्वीच पहिला सामना जिंकून बांगलादेशवर आघाडी मिळविली आहे. ही मालिका बरोबरीत राखण्यासाठी बांगलादेशला विजय मिळविणे गरजेचे आहे. या दुसऱ्या कसोटीत लंकेने 4 बाद 314 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांच्या उर्वरित 6 गड्यांनी 217 धावांची भर घातली. लंकेच्या डावात निशान मधुष्का, डी. करुणारत्ने, कुशल मेंडीस, दिनेश चंडीमल, कर्णधार धनंजय डिस्लिव्हा आणि कमिंदू मेंडीस यांनी अर्धशतके झळकाविली. कुशल मेंडीसचे शतक 7 धावांनी तर कमिंदू मेंडीसचे शतक 8 धावांनी हुकले. कमिंदू मेंडीसने 167 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 92 तर कुशल मेंडीसने 150 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 93 धावा जमविल्या. कुरुणारत्नेने 129 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 86, मदुष्काने 6 चौकारांसह 57, दिनेश चंडीमलने 2 षटकार आणि 5 चौकारांसह 59, कर्णधार धनंजय डिस्लिव्हाने 111 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 70, प्रभात जयसूर्याने 3 चौकारांसह 28 तसेच मॅथ्यूजने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23 धावा जमविल्या. लंकेचा पहिला डाव 159 षटकात 531 धावांवर आटोपला. बांगलादेशतर्फे शकिब अल हसनने 110 धावांत 3 तर हसन मेहमूदने 92 धावांत 2, खलिल अहमद व मेहदी हसन मिराझ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लंकेचे 3 फलंदाज धावचीत झाले. चहापानानंतर लंकेचा पहिला डाव संपुष्टात आला. त्यानंतर बांगलादेशने 15 षटकात 1 बाद 55 धावा जमविल्या. मेहमुदुल हसन 3 चौकारांसह 21 धावांवर बाद झाला. कुमाराने त्याचा त्रिफळा उडविला. झाकिर हसन 5 चौकारांसह 28 धावांवर खेळत आहे. या कसोटीतील खेळाचे तीन दिवस बाकी असून बांगलादेशचा संघ अद्याप 476 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 9 गडी खेळावयाचे आहेत. या कसोटीत लंकेचा संघ पुन्हा मोठ्या फरकाने विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
संक्षिप्त धावफलक – लंका प. डाव 159 षटकात सर्व बाद 531 (मधुष्का 57, करुणारत्ने 86, कुशल मेंडीस 93, मॅथ्यूज 23, चंडीमल 59, धनंजय डिस्लिव्हा 70, कमिंदू मेंडिस नाबाद 92, जयसूर्या 28, विश्वा फर्नांडो 11, शकिब अल हसन 3-110, हसन मेहमूद 2-92, खलिद अहमद व मेहदी हसन मिराझ प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश प. डाव 15 षटकात 1 बाद 55 (मेहमुदुल हसन जॉय 21, झाकिर हसन खेळत आहे 28, कुमारा 1-4).