आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा पर्दाफाश

आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा पर्दाफाश

महिला डॉक्टर समवेत 7 जणांना अटक : सूत्रधार बांगलादेशी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाची राजधानी दिल्लीत एका मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी एका मोठ्या रुग्णालयाच्या महिला डॉक्टर समवेत 7 जणांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी बांगलादेशपासून राजस्थानपर्यंत चाललेल्या या अवैध किडनी रॅकेटला चालविण्याच्या आरोपाखाली 50 वर्षीय महिला डॉक्टरलाही अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या महिला डॉक्टरने आतापर्यंत 15-16 प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करविल्या होत्या. अवैध स्वरुपात मानवी किडनीचे प्रत्यारोपण करण्याचा प्रकार बांगलादेशातून संचालित केला जात होता, परंतु प्रत्यारोपण शस्त्रक्रिया भारतात केली जात होती.
बांगलादेशच्या या रॅकेट प्रकरणी पूर्वी राजस्थान पोलिसांनी महत्त्वाचा खुलासा केला होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला होता. दिल्लीतील एका मोठ्या रुग्णालयातील महिला डॉक्टरने नोएडाच्या एका रुग्णालयात 15-16 शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले होते.
या महिला डॉक्टरच्या खासगी सहाय्यकाच्या बँक खात्यात या अवैध शस्त्रक्रियेप्रकरणी पैसे जमा केले जात होते. दिल्ली पोलिसांनुसार हे पूर्ण रॅकेट बांगलादेशातून संचालित केले जात होते. याकरता बांगलादेशात रॅकेटचे सदस्य डायलिसिस सेंटरला जात तेथे कुठल्या रुग्णाला किडनीची  गरज आहे आणि तो किती पैसे खर्च करू शकतो हे पाहत होते. रुग्णाने 25-30 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविल्यावर त्याला उपचाराच्या नावाखाली भारतात पाठविले जायचे. त्यानंतर रॅकेटचे सदस्य एखाद्या गरीब बांगलादेशीला हेरून त्याला पैशांचे आमिष दाखवत किडनी दान करण्यास तयार करायचे. मग त्याला संबंधित रुग्णाचा नातेवाईक ठरून बनावट दस्तऐवज तयार केले जाते. मग महिला डॉक्टरकरवी त्याची किडनी काढली जात होती.
या महिला डॉक्टरला दिल्ली पोलिसांनी 4 दिवसांपूर्वीच अटक केली आहे. प्रकरण समोर  आल्यावर संबंधित रुग्णालयाने महिला डॉक्टरला निलंबित केले आहे. काही अवयवदात्यांनी नोकरीच्या नावावर भारतात आणून किडनी काढून घेण्यात आल्याची तक्रार केली आहे.