भारतीय पुरूष हॉकी संघ स्वीसला रवाना

भारतीय पुरूष हॉकी संघ स्वीसला रवाना

वृत्तसंस्था/बेंगळूर
हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरूष हॉकी संघाने मंगळवारी स्वीसला प्रयाण केले. भारतीय संघ काही सरावाचे सामने नेदरलॅंडस्मध्ये खेळणार आहे. हे सरावाचे सामने संपल्यानंतर भारतीय हॉकी संघ 20 जुलै रोजी ऑलिंपिकसाठी पॅरिसमध्ये दाखल होईल.
पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा ब गटामध्ये समावेश आहे. भारतीय हॉकी संघाच्या ऑलिंपिक मोहिमेला न्यूझीलंड विरूध्दच्या सामन्याने 27 जुलैला प्रारंभ होईल. भारताचा दुसरा सामना 29 जुलैला अर्जंटीनाबरोबर होणार आहे. त्यानंतर भारताचा तिसरा सामना आयर्लंडबरोबर 30 जुलैला तर बेल्जियमबरोबर 1 ऑगस्टला खेळविला जाईल. ब गटातील भारताचा शेवटचा सामना 2 ऑगस्ट रोजी बलाढ्या ऑस्ट्रेलियाबरोबर होईल. या गटातून पहिले 4 संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये भारतीय हॉकी संघासाठी दोन आठवड्यांचे सराव शिबिर आयोजित केले होते. पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय हॉकी संघाने जोरदार तयारी केली असून भारतीय संघ दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास कर्णधार हरमनप्रित सिंगने स्वीसला प्रयाण करण्यापूर्वी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला.