रशियन सैन्यातील भारतीय मुक्त होणार
भारताचा प्रस्ताव रशियाला मान्य, मैत्री सर्वकालीन असल्याचे पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य : रशियाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान
वृत्तसंस्था / मॉस्को
रशियात बेकायदेशीर मार्गाने जाऊन तेथे सैन्यात नोकरी मिळविलेल्या आणि सध्या रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय युवकांची सुटका करण्याचा भारताचा प्रस्ताव रशियाने मान्य केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्याचे हे महत्त्वाचे फलित मानले जात आहे. याशिवाय या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे द्विपक्षीय करार करण्यात आले आहेत. दोन्ही नेत्यांच्या चर्चेत युक्रेन-रशिया युद्ध हा विषयही होता. युद्धामुळे कोणतीही समस्या सुटणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेत केले. भारत आणि रशिया यांची मैत्री सर्वकालिन आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील भारतीय समाजाने आयोजित केलेल्या स्वागत कार्यक्रमात काढले. पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ द सेंट एंड्य्रू द एपोस्टल’ने गौरविण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2 दिवसांच्या रशिया दौऱ्याला सोमवारी प्रारंभ झाला. मंगळवारी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री अधिकाधिक दृढ आणि व्यापक करण्याचा निर्धार या चर्चेत व्यक्त करण्यात आला. संरक्षण, व्यापार, गुंतवणूक आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याला अधिक चालना देण्याचा निर्णयही दोन्ही नेत्यांनी घेतला आहे.
रशियात 35 ते 40 युवक
भारतातील काही युवक रशियात बेकायदेशीर मार्गाने गेले आहेत. त्यांनी तेथे रशियन सेनेत सैनिकाची नोकरी मिळविली आहे. असे 35 ते 40 सैनिक सध्या युक्रेन आणि रशिया युद्धात रशियाच्या बाजूने लढत आहेत. या सैनिकांची सुटका करावी आणि त्यांना भारतात परतू द्यावे, असा प्रस्ताव भारताने मांडला होता. तो रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी मान्य केला आहे. परिणामी या युवकांची सुखरुप सुटका होण्याची शाश्वती निर्माण झाली आहे. चार भारतीय युवक या युद्धात आतापर्यंत कामी आलेले असून 10 जण भारतात परतलेले आहेत.
भारतीय समाजाचा कार्यक्रम
रशियात वास्तव्यास असणाऱ्या भारतीय समाजाच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी केले होते. भारत आणि रशिया यांची मैत्री सर्वकालिन असून ती आगामी काळात अधिक दृढ होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात भाषण करताना व्यक्त केला. येथील भारतीय समाज हा दोन्ही देशांमधील संबंधांचा एक महत्त्वाचा सेतू आहे. भारत आणि रशिया यांचे संबंध गेल्या सात दशकांपासूनच असून ते विविध क्षेत्रांमध्ये दृढ झाले आहेत. रशिया भारताच्या प्रगतीतील महत्त्वाचा भागीदार आहे, अशीही भलावण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केली.
प्रथम दौरा रशियाचा
सलग तिसऱ्यांदा देशाचे प्रमुख पद हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रथम विदेश दौऱ्यासाठी रशियाची निवड केली. यातूनच भारत रशियाला किती महत्त्व देतो हे दिसून येते, असे तज्ञांचे मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यापूर्वी इटलीला जी-7 परिषदेसाठी विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते. तथापि, अधिकृत दौरा रशियाचाच मानला गेला आहे. याला विशेष महत्त्व आहे.
दौऱ्याकडे जगाचे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. विशेषत: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य जग या दौऱ्याकडे सावध दृष्टीने पहात आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी भारत रशियाशी असणाऱ्या आपल्या मैत्रीचा उपयोग करेल, अशी पाश्चिमात्य देशांची अपेक्षा आहे.
अमेरिकेची सावध भूमिका
भारताने रशियाशी अंतर राखून संबंध ठेवावेत, असा दबाव अनेक पाश्चिमात्य देशांकडून भारतावर सातत्याने आणला जात आहे. युक्रेन युद्धामुळे अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियाशी संबंध तोडले आहेत. अमेरिकेने रशियावर निर्बंध घातले आहेत. भारतालाही तसा इशारा अमेरिकेने दिला होता. तथापि, आजपर्यंत तरी अमेरिकेने भारत-रशिया संबंधांकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येते. भारत रशियाकडून शस्त्रसामग्री आयात करत असूनही अमेरिकेने भारताला निर्बंधांपासून मुक्त ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रशिया दौऱ्यासंबंधी अमेरिकेने सावध भूमिका घेतली असून सौम्य शब्दांमध्ये चिंता व्यक्त केली आहे. भारत हा अमेरिकेचा विविध क्षेत्रांमधील विश्वासू भागीदार आहे. त्यामुळे भारताशी सर्व विषयांवर अमेरिकेची मनमोकळी चर्चा होत असते. रशियाशी असलेल्या संबंधांविषयी भारताकडे अमेरिकेने आपली चिंता व्यक्त केली आहे, असे अमेरिकेच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रियात आगमन
रशियाच्या दौऱ्यानंतर मंगळवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऑस्ट्रियात आगमन झाले आहे. राजधानी व्हिएन्ना येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. हा दौराही दोन दिवसांचा आहे. या दौऱ्यात ते ऑस्ट्रियन नेत्यांशी द्विपक्षीय संबंध, व्यापार आणि गुंतवणूक आदी विषयांवर चर्चा करतील. दोन्ही देशांमध्ये काही करारही होण्याची शक्यता आहे. कोणत्याही भारतीय राष्टप्रमुखाने या देशाला भेट देण्याची ही 1983 नंतरची प्रथमच वेळ आहे. त्यावर्षी इंदिरा गांधी यांनी भेट दिली होती.
लक्षवेधी रशिया दौरा
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्ण करार
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशियाभेटीमुळे व्लादिमीर पुतीन समाधानी
ड पाश्चिमात्य जगाचेही दौऱ्याकडे लक्ष, अमेरिकेकडून सावध भूमिका
ड या दौऱ्यासंबंधी चीनचे मौन, पण रशियाकडून चीनला अप्रत्यक्ष इशारा
Home महत्वाची बातमी रशियन सैन्यातील भारतीय मुक्त होणार
रशियन सैन्यातील भारतीय मुक्त होणार
भारताचा प्रस्ताव रशियाला मान्य, मैत्री सर्वकालीन असल्याचे पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य : रशियाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान वृत्तसंस्था / मॉस्को रशियात बेकायदेशीर मार्गाने जाऊन तेथे सैन्यात नोकरी मिळविलेल्या आणि सध्या रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय युवकांची सुटका करण्याचा भारताचा प्रस्ताव रशियाने मान्य केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्याचे हे महत्त्वाचे फलित मानले जात आहे. याशिवाय […]