हिंडलगा ग्रा. पं.चा कारभार रामभरोसे

पूर्णवेळ पीडीओची मागणी, विकासकामांना खिळ, जि. पं. सीईओंना निवेदन बेळगाव : तालुक्यातील मोठी ग्राम पंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंडलगा ग्राम पंचायतीचा कारभार रामभरोसे झाला आहे. संबंधित पीडीओवर हिंडलगा, मुतगा आणि तालुका पंचायतीचा ताण असल्याने वेळेत कामे होईनासी झाली आहेत. त्याबरोबर स्वच्छता, गटारी, कर संकलन, संगणक उतारे आदी कामांचा नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे हिंडलगा ग्रा.पं.ला पूर्ण वेळ पीडीओ […]

हिंडलगा ग्रा. पं.चा कारभार रामभरोसे

पूर्णवेळ पीडीओची मागणी, विकासकामांना खिळ, जि. पं. सीईओंना निवेदन
बेळगाव : तालुक्यातील मोठी ग्राम पंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंडलगा ग्राम पंचायतीचा कारभार रामभरोसे झाला आहे. संबंधित पीडीओवर हिंडलगा, मुतगा आणि तालुका पंचायतीचा ताण असल्याने वेळेत कामे होईनासी झाली आहेत. त्याबरोबर स्वच्छता, गटारी, कर संकलन, संगणक उतारे आदी कामांचा नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे हिंडलगा ग्रा.पं.ला पूर्ण वेळ पीडीओ द्यावा, अशी मागणी हिंडलगा ग्राम पंचायत उपाध्यक्ष व सदस्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.हिंडलगा ग्रा. पं. कार्यक्षेत्रात बेकायदेशीर बांधकामांना ऊत आला आहे. मनमानीपणे बांधकाम केले जात आहे. ग्राम पंचायतीतीलच अधिकाऱ्यांचीच यामध्ये मिलीभगत असल्याची तक्रार सदस्यांनी केली आहे.
त्याबरोबर ग्रा. पं. हद्दीतील गटारींची दुर्दशा झाली असून स्वच्छतेकडे कानाडोळा झाला आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी आणि रोगराई वाढू लागली आहे. विशेषत: पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) ग्रा. पं. मध्ये वेळेत हजर राहात नसल्याने विकासकामे रखडली आहेत. शिवाय संगणक उतारे आणि इतर कागदपत्रे नागरिकांना मिळेनासी झाली आहेत. ग्रा. पं. मध्ये कर संकलनही वेळेत होत नसल्याने थकबाकी वाढू लागली आहे. एकूणच ग्रा. पं. च्या विकासाला खिळ बसली आहे. त्यामुळे जि. पं. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिंडलगा ग्रा. पं. कडे लक्ष देऊन पूर्णवेळ पीडीओची नेमणूक करावी. तसेच इतर समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रा. पं. सदस्यांनी दिला आहे.यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्षा चेतना अगसगेकर, सदस्य डी. बी. पाटील, विठ्ठल देसाई, राहुल उरणकर, अशोक कांबळे, रेणुका भातकांडे, प्रेरणा मिरजकर, सीमा देवकर, अलका कित्तूर आदी उपस्थित होते.