पर्जन्यराजाची विश्रांती, मोठे नुकसान!

पर्जन्यराजाची विश्रांती, मोठे नुकसान!

रविवारच्या आक्रमक पावसाने हाहाकार : सोमवारी दुपारनंतर स्थिती पूर्वपदावर,अनेक भागातील वीजपुरवठा खंडित
पणजी : मुसळधार पावसाने सोमवारी थोडी उसंत घेतली तरी रविवारच्या त्याच्या आक्रमक पवित्र्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन सोमवारी दुपारनंतर पूर्वपदावर आले. तथापि अनेक सखल भागातील पुराचे पाणी ओसरण्यास सोमवार सायंकाळपर्यंत वाट पहावी लागली. पावसाच्या माऱ्यामुळे मंडुर-तिसवाडी येथे घराची भिंत कोसळल्यामुळे आई व मुलगा जागीच मरण पावले. यामुळे गेल्या दोन दिवसांच्या तुफानी पावसात मरण पावलेल्यांची संख्या 5 झाली आहे. अनेक भागातील दरडी कोसळत आहेत. अनेक रस्ते पाण्याखाली जात आहेत. संपूर्ण गोव्याला झोडपलेला पाऊस सरासरी 9.5 इंच होता, तर राजधानी पणजीत तब्बल 14.50 इंच होता. गेल्या 25 वर्षांतील एका दिवसातील हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाऊस हा रविवारी पडला.
रविवारी पावसाच्या हैदोसामुळे सर्वत्र पूरसदृश निर्माण झालेल्या स्थितीतून जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी सोमवार सायंकाळ झाली. म्हापसा-पणजी मार्गावरील गिरी येथे शेतामध्ये पाण्याचा जोर एवढा होता की म्हापसा शहरात जाणाऱ्या वाहनचालकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागत होता. त्यामुळे काही वाहने पाण्यातच बंद पडली. सत्तरी तालुक्यात देखील अनेक भागातील घरांवर पडलेले वृक्ष, ठिकठिकाणी पुरामुळे घरांमध्ये शिरलेले पाणी त्यातच अनेक वीजतारांवर वृक्ष पडल्याने वीजतारा वीजखांबांसह तुटून पडल्याने सत्तरीच्या बऱ्याच भागात वीजप्रवाह खंडित झालेला होता.
दुपारनंतर पूर ओसरु लागला
पणजीमध्ये रात्री उशिरापर्यंत पाऊस चालू होता तर सत्तरीत रात्रभर पाऊस चालू होता. केवळ पावसाचे प्रमाण कमी व संततधार होती. डिचोली शहरात सायंकाळी उशिरा मोठा पूर आला व संपूर्ण मार्केट परिसर तसेच डिचोली न्यायालयामध्ये देखील पुराचे पाणी घुसले होते. मुसळधार पावसामुळे डिचोलीच्या नदीने आक्राळ विक्राळ ऊप धारण केले होते. पावसाचा जसा जोर वाढत गेला तसे पुराचे पाणी वाढत गेले आणि शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. मध्यरात्रीनंतर पुराच्या पाण्याचा जोर ओसरला. पणजीत 18 जून रस्ता, मिरामार येथील रस्ता, मळ्dयातील काही भाग हा रात्रभर पाण्याखालीच होता. सायंकाळी पणजीतील मिरामार परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसले. 18 जून रस्ता तर रात्रभर पाण्याखालीच होता. सकाळी 10 नंतर पूर ओसरला.
पणजीत पावसाचा धुमाकूळ 14.50 इंच, 25 वर्षांतील विक्रम
पणजीत रविवारी कोसळलेला पाऊस हा एवढा आक्रमक होता की रविवारी सकाळी 8.30 ते सोमवारी सकाळी 8.30 या दरम्यान 14.50 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली. वैज्ञानिक डॉ. नंदकुमार कामत यांच्या म्हणण्यानुसार, हा पाऊस हा आक्रमक होता व एक नवा विक्रम या पावसाने केलेला आहे. यापूर्वी 12 जून 1999 रोजी पणजीत 366.9 मिमी एवढा पाऊस पडला होता. दि. 16 जून 1992 रोजी 350.8 मिमी तर 15 जून 1996 रोजी 342.9 मिमी एवढी विक्रमी पावसाची नोंद राजधानी पणजीत झाली होती. गेल्या 50 वर्षांतील दुसऱ्यांदा सर्वाधिक पाऊस 24 तासांत पणजीत कोसळला तो आहे 360.8 मिमी व तो दि. 7 जुलै 2024 रोजी झाला. दरम्यान, आतापर्यंत यंदाच्या मौसमात सरासरी 58.50 इंच पाऊस पडलेला आहे व तो सरासरीच्या तुलनेत 11 इंच जादा आहे. गोव्यात पडलेला पाऊस हा 23 टक्के जादा आहे.
जुने गोवेला झोडपले, तब्बल 13. 50 इंच
जुने गोवे भागात नेहमीच मुसळधार पाऊस पडत असतो. गेल्या 24 तासांमध्ये जुने गोवेमध्ये 13.50 इंच एवढा विक्रमी पाऊस पडला. या पावसामुळे जुने गोवे येथील बायपास महामार्गाच्या पुलाखाली सर्वत्र पाणी साचले. त्यामुळे तिथून शंकराचे मंदिर ते गांधी चौक या दरम्यान पुराचे पाणी एवढे वाढले की शेवटी वाहतूकच बंद ठेवावी लागली. गवंडाळी खाडी ओलांडून जुने गोवेकडे जातानाच्या रस्त्याचा बराचसा भाग पाण्याखाली होता. जुने गोवे खुर्साकडे तर रस्त्यावऊन अक्षरश: नदीच वाहत होती. यामुळे वाहतुकीची सकाळी मोठी कोंडी निर्माण झाली.
अंजुणे धरण क्षेत्रात 7.5 इंच विक्रमी पाऊस
अंजुणे धरण क्षेत्रात शनिवार, रविवारी पावसाची जोरदार फटकेबाजी चालू होती. 24 तासांमध्ये धरण क्षेत्रात 10.50 इंच पाऊस पडला. यामुळे आता अंजुणे धरण सोमवारपर्यंत 54 टक्के भरलेले होते. अद्याप गेटपर्यंत पाणी पोहोचलेले नाही मात्र जुलैमध्ये नेहमीच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पुढील 15 दिवसांमध्ये धरण फुल्ल होण्याची शक्यता आहे. रविवारी 7 तासांमध्ये अंजुणे धरण क्षेत्रात 7.5 इंच पाऊस पडला.