मोदींच्या डोक्यात गेलेली सत्तेची नशा जनतेने उतरवली; विधानसभा निवडणुकीत सत्तांतर अटळ : शरद पवार

मोदींच्या डोक्यात गेलेली सत्तेची नशा जनतेने उतरवली; विधानसभा निवडणुकीत सत्तांतर अटळ : शरद पवार

कवठेमहांकाळ येथे शेतकरी मेळावा : सरकार जनतेच्या उपयोगाचे नाही : ‘महांकाली’ला पहिल्या कॅबिनेटमध्ये मदत करणार

कवठेमहांकाळ प्रतिनिधी
येत्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन अटळ आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर हे राज्य नव्या पिढीच्या हातात देण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी करून भाजपसह पंतप्रधान मोदींवर त्यांनी हलाबोल केला. मोदींच्या डोक्यात गेलेली सत्तेची नशा जनतेने उतरवली, असे टीकास्त्र ही पवार यांनी सोडले.
स्व. आर. आर. आबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. लोकसभेच्या निवडणुकीत चारशे पारचा नारा भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी केला होता. मात्र, जनतेने भाजपला बहुमताचा आकडासुद्धा गाठू दिला नाही. जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच त्यांना जनतेने झटका दिला, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या जागतिक कीर्तीच्या पंतप्रधानावरसुध्दा टीका करायला मोदी यांनी मागेपुढे पाहिले नाही. ज्या राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली. एक तरूण नेतृत्व पुढे येत असताना त्यांच्यावर हल्ले सुरू केले. ही बाब लोकशाहीसाठी घातक ठरली आणि म्हणूनच आम्ही मोदींना पर्याय देण्यासाठी इंडीया आघाडीची स्थापना केली. लोकशाहीत एक सक्षम विरोधी पक्ष उभा करू शकलो, असेही शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उध्दव ठाकरे यांची शिवसेना या महाविकास आघाडीला राज्यातील जनतेने 31 जागा दिल्या. पाच वर्षांपूर्वी ज्या जनतेने आम्हाला सहा जागा दिल्या होत्या. त्याच जनतेने पा†रवर्तन घडविले. निलेश लंकेसारखा सामान्य घरातील माणूस खासदार बनू शकतो, दिंडोरीमध्ये भगरे यांना जनतेने खासदार केले. हिच जनतेची ताकद असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात आपण अनेक ठिकाणी फिरत आहे. लोकांशी संवाद साधताना राज्य सरकारबद्दल त्यांच्या मनात चिड आहे. त्यामुळेच येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडेल, असा दावाही पवार यांनी केला. राज्यातील आजारी साखर कारखान्यांना मदत करण्याऐवजी हे सरकार बलवान साखर कारखान्यांना आर्थिक मदत देते. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट मिटींगमध्ये महांकाली साखर कारखान्याला मदत करण्यात येईल, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.
राज्यात अडचणीत आलेल्या दुध व्यवसायतही सरकारने दुर्लक्ष केले आहे. जे सरकार तरूण, शेतकरी आणि सामान्य माणसाकडे दुर्लक्ष करते, असे सरकार सत्तेवर फार काळ टिकत नाही. आणि उद्याच्या निवडणुकीत हे सरकार सत्तेतून बाहेर जाईल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील विधानसभेचा पाहिला निकाल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, अशी ग्वाही रोहत पाटील यांनी दिली. या कार्यक्रमास आमदार सुमनताई पाटील, आमदार अरूण लाड, अनिता सगरे यांच्यासह विवध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रोहित पाटील यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. या शेतकरी मेळाव्याला प्रचंड गर्दी जमली होती.
सत्ता मोदींच्या डोक्यात शिरली आहे
आपण राज्यभर फिरत आहे, त्यामुळे जनतेने परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे, हे दिसत आहे. कितीही यश मिळाले तरी सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नसते. पण, लोकांनी जागा घटवूनसुध्दा लोकसभेमध्ये आपण पाहिले की, सत्ता त्यांच्या डोक्यात गेली आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत रॅली काढली. त्या राहूल गांधी यांच्यावर हला करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी यांची प्रवृत्ती देशाच्या हिताची नाही.
जिल्हा परिषदेतच आर. आर. हा बंदा रूपया हेरला
निर्णय घेण्याचे क्षमता आणि निर्णय राबवण्याची ताकत ज्याच्या मध्ये होती- त्यांचे नाव होते आर. आर. आबा. आर. आर. आबांची ओळख सांगलीच्या जिल्हा परिषदमध्ये झाली. त्यावेळी हा बंदा रूपया आहे, त्याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे, म्हणून विधानसभेची संधी दिली आाणि भरघोस मताने ते निवडून आले. ग्रामविकास मंत्री झाल्यावर आबांनी ग्रामविकास खात्याला गती दिली. आर. आर. आबा निघून गेले. संपूर्ण महाराष्ट्र हळहळला ,महाराष्ट्राचे ते भवितव्य होते. आबांच्या जाण्यानंतर अस्वस्थता जाणवत होती. मात्र, आता आनंद वाटतोय सुमनताई आणि रोहित पाटील यांच्यामुळे ती अस्वस्थता दूर होत आहे.