सलग तिसऱ्या दिवशीही दमदार पाऊस

खानापूर तालुक्यातील नागरिकांना दिलासा : ढगांच्या गडगडाटासह पाऊस : शेतीसाठी उपयोगी ठरणार : नागरिकांची तारांबळ वार्ताहर /किणये तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही दमदार वळीव पावसाने हजेरी लावली. रविवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. शेतीसाठी व खरीप हंगामाच्या मशागतीसाठी हा पाऊस उपयोगी ठरणारा आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. बऱ्याच ठिकाणी पावसाच्या पाण्याचा […]

सलग तिसऱ्या दिवशीही दमदार पाऊस

खानापूर तालुक्यातील नागरिकांना दिलासा : ढगांच्या गडगडाटासह पाऊस : शेतीसाठी उपयोगी ठरणार : नागरिकांची तारांबळ
वार्ताहर /किणये
तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही दमदार वळीव पावसाने हजेरी लावली. रविवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. शेतीसाठी व खरीप हंगामाच्या मशागतीसाठी हा पाऊस उपयोगी ठरणारा आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. बऱ्याच ठिकाणी पावसाच्या पाण्याचा गटारींमधून निचरा होत नसल्यामुळे थेट रस्त्यावर व काही नागरिकांच्या दुकान व घरांमध्ये पाणी आले होते. रविवारी सायंकाळी ढगांचा गडगडाट सुरू झाला व जोरदार पाऊस बरसण्यास सुऊवात झाला. जोरदार वादळी वाराही आला. यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. पावसामुळे शेत शिवारामध्ये बऱ्यापैकी पाणी साचलेले निदर्शनास आले. शुक्रवारी वळीव पावसाने हजेरी लावली. याचबरोबर शनिवारीही जोरदार पाऊस झाला. यामुळे हवामानात गारवा निर्माण झाला होता. रविवारी सकाळी पुन्हा उष्णतेमध्ये वाढ झाली असल्याचे नागरिकांना जाणवत होते. मात्र दुपारनंतर गडद वातावरण निर्माण झाले आणि सायंकाळी जोरदार पाऊस झाला. यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी वाहताना दिसून आले.
रविवारी पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. रविवार सुटीचा दिवस असल्याने ग्रामीण भागातील नागरिकही शहराला विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी आले होते. या लोकांना मात्र सायंकाळी घरी जाताना पावसात भिजतच घरी जावे लागले. रविवारी बऱ्याच गावांमध्ये लग्नसोहळे व विविध प्रकारचे घरगुती कार्यक्रम होते. त्यामुळे मित्रमंडळी व पै-पाहुणे यांची वर्दळ कार्यालय तसेच गावागावांमध्ये दिसून आली. मात्र पावसामुळे या कार्यक्रम करणाऱ्यांचा हिरमोड झाला. सध्या झालेल्या पावसामुळे शेत शिवारामध्ये ओलावा निर्माण झाला असून काही शिवारांमध्ये पाणी साचलेले आहे. पावसाअभावी विहिरी व कूपनलिका यांच्या पाणीपातळीत घट झाली होती. अवघ्या दोनच दिवसात या पाणीपातळीत वाढ झाली असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली आहे. तसेच कडक उन्हामुळे शिवारातील पिके सुकून जात होती. या वळिवाच्या तीन दिवस झालेल्या पावसामुळे ऊस व इतर सर्व पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात 20 मे नंतर धूळवाफ पेरणीला सुऊवात करण्यात येते. खरीप हंगामातील मशागतीसाठी हा पाऊस उपयोगी ठरणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
बस्तवाड, मच्छे, पिरनवाडी, देसूर,संतीबस्तवाड, किणयेत मुसळधार
तालुक्यात उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यामुळे कडक उन्हाचे चटके साऱ्यांनाच सहन होत नव्हते. मात्र ज्या पद्धतीने साऱ्यांनीच उष्णतेचा सामना केला. त्याच पद्धतीने शुक्रवार, शनिवार व रविवारी झालेल्या पावसामुळे मात्र नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. बस्तवाड, हलगा, मच्छे, पिरनवाडी, झाडशहापूर, देसूर, नंदीहळळी, संतीबस्तवाड, वाघवडे, रणकुंडये, किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी, नावगे, बामणवाडी, कावळेवाडी, बेळवट्टी, राकसकोप, सोनोली, यळेबैल, बोकनूर, बेळगुंदी, इनाम बडस आदी गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला.
मच्छे गावातील अनेक गटारींमध्ये केरकचरा
मच्छे गावातील अनेक गटारींमध्ये केरकचरा सापडला होता. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा झाला नसल्यामुळे काही जणांच्या थेट घरामध्ये पाणी शिरले होते. हे पाणी काढत असताना नागरिकांची तारांबळ उडाली होती. पिरनवाडी येथील पाटील गल्ली व सिद्धेश्वर गल्लीतील बऱ्याच दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते.