शिवा क्लिनिकवर आरोग्य खात्याची धाड

भडकल गल्लीतील क्लिनिक बेकायदेशीर असल्याचे आढळल्याने टाळे ठोकले  बेळगाव : आयुर्वेदिकच्या नावावर ऍलोपॅथिक औषधे देणे, परवाना एकाचा चालविणारा दुसरा, बोगस डीग्री असूनही उघडलेला दवाखाना व केपीएमई कायद्याचे उल्लंघन अशा विविध कारणांमुळे आरोग्य खात्याने भडकल गल्ली येथील शिवा क्लिनिकवर धाड टाकून टाळे ठोकले. तसेच गुरुकृपा क्लिनिकने वैद्यकीय कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव त्याच्या चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचवेळी सांबरा येथील चिरायू क्लिनिकवरही धाड […]

शिवा क्लिनिकवर आरोग्य खात्याची धाड

भडकल गल्लीतील क्लिनिक बेकायदेशीर असल्याचे आढळल्याने टाळे ठोकले 
बेळगाव : आयुर्वेदिकच्या नावावर ऍलोपॅथिक औषधे देणे, परवाना एकाचा चालविणारा दुसरा, बोगस डीग्री असूनही उघडलेला दवाखाना व केपीएमई कायद्याचे उल्लंघन अशा विविध कारणांमुळे आरोग्य खात्याने भडकल गल्ली येथील शिवा क्लिनिकवर धाड टाकून टाळे ठोकले. तसेच गुरुकृपा क्लिनिकने वैद्यकीय कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव त्याच्या चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचवेळी सांबरा येथील चिरायू क्लिनिकवरही धाड टाकण्यात आली. आरोग्य खात्याच्या या धडक कारवाईने बोगस व भोंदू डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. भडकल गल्ली येथील बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या शिवा क्लिनिकवर आरोग्य खाते व आयुष खात्याकडून संयुक्तपणे धाड टाकून क्लिनिकला टाळे ठोकण्यात आले. यामुळे बेकायदेशीरपणे क्लिनिक चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अशा बेकायदेशीर क्लिनिकांवर धडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी महेश कोणी यांनी दिला.
भडकल गल्ली येथे अनेक वर्षांपासून शिवा क्लिनिक सुरू आहे. या क्लिनिकमध्ये आयुर्वेदिक औषधांच्या नावावर ऍलोपॅथिक औषधे दिली जात आहेत. येथे काही गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार आरोग्य खात्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व आयुष खात्याच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली. शिवा क्लिनिकसाठी एका व्यक्तीच्या नावाने परवाना घेण्यात आला आहे. तर सदर क्लिनिक दुसरीच व्यक्ती चालवित आहे. घेण्यात आलेली डीग्री बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे. आरोग्य व आयुष खात्याकडून परवाना घेण्यात आला आहे. मात्र नियम व अटींची पूर्तता करण्यात आलेली नाही. परवाना एका व्यवसायासाठी घेण्यात आला असून याठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.
संशयास्पद कारभार
क्लिनिकमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे ओपीडी रजिस्टर ठेवण्यात आलेले नाही. गायनॉकोलॉजीचा परवाना घेण्यात आला असला तरी त्याठिकाणी वेगळीच औषधे ठेवण्यात आली आहेत. ऍलोपॅथिकची परवानगी घेण्यात आली आहे. मात्र तेही संशयास्पद आहे. औषधांचे दुष्परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून औषधेही तपासासाठी घेण्यात आली आहेत, असे डॉ. महेश कोणी यांनी सांगितले. क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्णांकडे विचारणा करता याठिकाणी वेगळाच प्रकार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. औषध तपासणी विभागाचे डॉक्टर, आयुष्मान विभागाच्या डॉक्टरांसह पोलीस व तहसीलदार बसवराज नागराळ यांच्या उपस्थितीमध्ये क्लिनिकची तपासणी करून पंचनामा करण्यात आला. सदर तपासामध्ये डॉक्टरांच्या पदव्या बोगस असल्याचे निदर्शनास आल्याने सदर कारवाई करण्यात आली. पुढील तपास संबंधित विभागाकडून केला जाणार असून तोपर्यंत क्लिनिकला टाळे ठोकले असून पुढील चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा व तालुका आरोग्य खात्याकडून शहरासह तालुक्यातील बेकायदेशीर क्लिनिकवर कारवाई करण्यात आलेली आहे. सांबरा येथील क्लिनिकवर तालुका आरोग्याधिकारी संजय डुमगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. तर शहरामध्ये भडकल गल्ली व गुरुकृपा क्लिनिक या ठिकाणी कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. तालुका तहसीलदार बसवराज नागराळ व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये क्लिनिकची तपासणी करून पंचनामा करण्यात आला. यावेळी आयुष्मानचे डॉ. श्रीकांत सुनधोळी, डॉ. पद्मराज पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये कारवाई तीव्र करू
जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावांमध्ये बेकायदेशीरपणे थाटण्यात आलेल्या क्लिनिक संदर्भात माहिती घेण्यासाठी संबंधित तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे क्लिनिक थाटल्याचे आढळून आल्यास त्याचक्षणीच कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही डॉ. महेश कोणी यांनी सांगितले.